श्रीवर्धन : उन्हाळी सुट्टी साजरी करण्यासाठी पर्यटक श्रीवर्धनला जास्त पसंती देताना दिसत आहेत. श्रीवर्धन तालुक्याला निसर्गसौंदर्याचे वरदान प्राप्त झालेले आहे. श्रीवर्धन शहरास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, त्याचसोबत हरिहरेश्वर व दिवेआगार यांचे आध्यात्मिक महत्त्व वेद-उपनिषदांत अधोरेखित केले आहे. पर्यटनाच्या सोबत धार्मिक भावना व जिज्ञासा पर्यटनवाढीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. श्रीवर्धन नगरपरिषदेने पर्यटनपूरक बाबीसाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगला आहे. समुद्रकिनाºयावर पर्यटकास आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
नगरपरिषदेच्या सफाई कामगारांकडून समुद्रकिनाºयावर नियमित स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली जाते. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किनाºयावर सीसीटीव्ही कॅमेरे स्थानबद्ध करण्यात आले आहेत. सकाळी ६ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत समुद्रकिनाºयावर जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नगरपरिषदेने बंद अवस्थेत असलेली प्रसाधनगृहे सुरू केली आहेत, त्यामुळे पर्यटकांच्या चेंजिंग रूमचा प्रश्न निकाली निघाला आहे. श्रीवर्धन नगरपरिषदेने पर्यटनाच्या माध्यमातून विकास के ला असून, भुवनाळे तलाव, जीवनेश्वर कुंड पर्यटकांस आकर्षित करत आहेत. पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे स्थानिक छोट्या व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. त्याचसोबत हॉटेल व्यवसायाला सुगीचे दिवस सुरू झाले आहेत.
हरिहरेश्वर व दिवेआगारला पर्यटनाबरोबर सुवर्ण गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत. पर्यटनास पूरक भूमिका नगरपरिषदेने घेतली आहे. पर्यटकांच्या दृष्टीने आवश्यक सर्व बाबी लक्षात घेऊन सकारात्मक भूमिका नगरपरिषद प्रशासन घेत आहे. समुद्रकिनारा सुंदर दिसावा व आलेल्या पर्यटकांस आनंद मिळावा व त्याद्वारे स्थानिक पातळीवर रोजगारात वाढ व्हावी, यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे. - किरणकुमार मोरे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, श्रीवर्धन
उन्हाळी सुट्टी असल्यामुळे पर्यटनात वाढ झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात पर्यटनास चालना मिळाली आहे. हॉटेल व्यवसायाला मार्च महिन्यात अवकळा आली होती, त्यामुळे धंदा खालावला होता; परंतु सद्यस्थितीत धंदा योग्य पद्धतीने चालू आहे. श्रीवर्धन नगरपरिषद पर्यटनपूरक भूमिका घेत आहे, त्याचे स्वागत आहे. - गणेश पोलेकर, व्यावसायिक, श्रीवर्धन
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात धंद्याला तेजी प्राप्त झाली. स्थानिक लोकांच्या सोबत पर्यटक उपलब्ध झाल्यामुळे धंद्याची चिंता मिटली. कारण आगामी जून महिन्यानंतर तीन महिने धंद्यातून मिळकतीचा प्रश्न निर्माण होतो. - पिंट्या माने, व्यावसायिक, श्रीवर्धन