n लोकमत न्यूज नेटवर्कविरार : वसई-विरार महापालिकेने सर्व दुकानदार आणि व्यावसायिकांना व्यवसाय कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पालिकेने व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता हा कर लागू केला असल्याचा आरोप व्यापारी संघटनांनी केला आहे.महापालिकेने दुकानदार आणि व्यावसायिकांना व्यवसाय कर लावण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी व्यवसाय परवाना काढावा लागणार आहे. त्यानुसार, परवाना शुल्क आकारले जाणार आहे. वसई-विरारमधील सर्व व्यावसायिक आणि दुकानदारांना व्यवसाय परवाना बंधनकारक आहे. किमान १ हजार रुपयांपासून हा व्यवसाय कर आकारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने व्यापाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. शहरात याची जाहिरातही करण्यात आली आहे. मात्र, पालिकेने शहरातील व्यावसायिक आणि दुकानदारांसाठी लागू केलेल्या नव्या व्यवसाय कराला शहरातील व्यावसायिकांनी विरोध केला आहे. कोरोना काळात आर्थिक संकट असताना, अचानक हा नवीन परवाना विश्वासात न घेता लागू केल्याच्या तक्रारी व्यापारी संघटनांनी केल्या आहेत.या करामुळे पालिकेच्या उत्पन्नात दरवर्षी ६० ते ७० कोटी रुपयांची वाढ होणार आहे. मात्र, अचानक परवाना बंधनकारक करण्यात आल्यामुळे व्यावसायिक गोंधळले आहेत. या नव्या परवान्याबाबत व्यापारी वर्गातून विरोधाचे सूर उमटत आहेत. दरम्यान, कायदे अभ्यासक निमेष वसा यांनी महापालिका अधिनियमाच्या तरतुदींचा चुकीचा अर्थ लावून हा नवीन परवानाा लागू केला असल्याचा आरोप केला आहे. ही व्यापाऱ्यांची फसवणूक असून, या विरोधात न्यायालात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.पालिका मात्र आपल्या या करावर ठाम आहे. व्यापाऱ्यांना याची माहिती दिल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९, कलम ३७६ (प्रकरण १८)नुसार या कराची आकारणी केली जात आहे. त्यामुळे सर्व विक्रेत्यांना आणि व्यावसायिकांना हा परवाना काढावाच लागेल, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी दिली.
महापालिकेच्या व्यवसाय कराला व्यापाऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:33 AM