पारोळ : गणेशोत्सवात वसई तालुक्यातील शिरवली गावात सारीपाटाचा डाव मांडला जात असून पालघर जिल्ह्यात याच गावात हा खेळ खेळला जातो. वसईत हा कुतुहालाचा विषय ठरला आहे.
महाभारतात खेळले गेलेले द्यूत अर्थात सारीपाट. आताच्या काळात एका मालिकेतून त्याचे दर्शन महाराष्ट्राला झाले, तो सारीपाट खेळ गणेशोत्सवात वसईतील शिरवली गावात खेळला जातो. ८१ वर्षांपासून दर गणेशोत्सवात हा खेळ खेळला जात असून आजही ही परंपरा सुरू आहे. या खेळासाठी कापडी सारीपाट वापरला जात असून सोंगट्या म्हणून लाकडी सोंगट्यांचा वापर होतो. लाकडी सोंगट्या कापडी पटावर ठेऊन हा खेळ सुरु होतो. तर फासे म्हणून कवड्यांचा वापर केला जातो. ज्याप्रमाणे खेळाडू कवड्याचे दान घेतो त्या दानानुसार सोंगटी पटावर चालवली जाते. हा खेळ दोन गटात खेळवला जात असल्याने ज्या गटाच्या सोंगट्या सारीपाटाच्या मध्यभागी सर्वात प्रथम जातील तो गट विजयी होतो. या खेळात एक डाव पूर्ण होण्यासाठी ४ तास लागतात. विशेष म्हणजे या खेळात पैशाचा वापर केला जात नाही. एक उत्सव म्हणून अनेक वर्षापासून गणपतीत जागर व्हावा म्हणून करमणुकीसाठी हा खेळ खेळला जातो. पूर्वी या खेळात मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचा सहभाग असायचा. मात्र मैदानी खेळांप्रमाणेच तरुण वर्गाने या खेळाकडे पाठ फिरवली आहे.महाभारतात हा खेळ खेळल्याचे सर्वश्रुत आहे. याच खेळात हरल्याने पांडवांना १२ वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात काढावे लागले होते. आजकालच्या स्मार्ट मोबाइलमध्ये आढळणारा ल्युडो गेम हा या द्युत किंवा सारीपाटाचाच आधुनिक अवतार म्हणावा लागेल, इतका सारखेपणा त्यात दिसतो. मात्र, खेळ जरी सारखा असला तरी समोरासमोर बसून, गप्पागोष्टी करून हा खेळ खेळण्यात, दुसऱ्यावर मात करण्यात जी मजा आहे, ती मोबाइल गेममध्ये निश्चितच नाही.