सुनील घरत
पारोळ : रस्ते अपघातानंतर लोकांच्या रोषाला घाबरून पळून जाणाऱ्या जड वाहनचालकांविरुद्ध संसदेत पारित झालेल्या कठोर विधेयकाच्या निषेधार्थ मुंबई- अहमदाबाद मार्गावर चिंचोटी व बाफाने फाटा येथे मोटारचालकांसह वाहतूकदारांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो वाहनचालक व वाहतूकदार सहभागी झाले होते. नववर्षाच्या पहिल्या दिवशी वाहतूक कोंडी झाल्याने नववर्ष साजरे करून येणाऱ्या पर्यटकांचे या वाहतूककोंडीमुळे मोठे हाल झाले.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महामार्गावर झालेल्या या आंदोलनात दोन्ही बाजूकडील वाहतुकीची कोंडी झाली होती. तर काही आंदोलकांनी वाहनांसह आंदोलनात सहभाग घेतला होता. महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या झेड्याखाली झालेल्या या आंदोलनात देशात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता संसदेत मोदी सरकारने नवीन विधेयक मंजूर करून घेतले आहे.
रस्त्यावर अपघात घडल्यानंतर जड वाहनांचे चालक जखमींची मदत करण्यासाठी न थांबता पळून जातात. अशा चालकाविरुद्ध नवीन कायद्यानुसार दाखल होणाऱ्या खटल्यात दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा होण्याची तरतूद आहे. वास्तविक पाहता अशा अनेक अपघातांमध्ये वाहनचालक झुंडीच्या हल्ल्यामुळे घाबरून पळून जातात. पळून जाणे हा त्यांचा दोष असू शकत नाही, तर ती अपरिहार्यता असते, असे आंदोलनकर्त्या वाहनचालकांचे म्हणणे आहे