विरार : वसई-विरारमधील सार्वजनिक प्रवासी सेवा हळूहळू रुळावर येत असली तरी ती अद्याप अपुरी आहे. त्यामुळे वसईकर मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात. मात्र दाटीवाटीने होणाऱ्या प्रवासामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरण्याचा धोका आहे. सध्या वसईत रिक्षामधून धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू आहे. हा प्रकार म्हणजे कोरोनावाढीला हातभार असून यावर वाहतूक विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
वसईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा १६ हजारांच्या पुढे गेला आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या ३४५ झालेली आहे. कोविडच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत. तसेच टाळेबंदी शिथिल करताना खाजगी वाहतूक, आस्थापने यांना व्यवसायासाठी सूट देण्यात आली असतानादेखील येथे सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जात आहेत.
रिक्षात केवळ दोनच प्रवाशांना नेण्याची मुभा रिक्षाचालकांना आहे, तर प्रवासी वाहनांमध्येही नियमांचे बंधन आहे. परंतु कमाईसाठी रिक्षाचालक दोन-तीन नव्हे तर चार-पाच प्रवासी रिक्षात भरून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसते. सध्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक साधने अपुरी असल्याने नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. अशा वेळी रिक्षाचालकही प्रवाशांच्या असहायतेचा फायदा घेत रिक्षा पूर्ण भरल्याशिवाय निघत नाहीत.कारवाईची होतेय मागणीवसई शहरात प्रवाशांना कोंबून नेणाºया रिक्षाचालकांकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. अशा रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने कडक कारवाई करावी, अशी मागणी ते करत आहेत.