अनिरुद्ध पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्थेच्या उपक्रमाअंतर्गत मच्छीपासून मूल्यवर्धित पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण डहाणूतील किनाऱ्यालगत च्या गावातील महिला बचत गटांना दिले जात असून त्याला भरघोस प्रतिसाद लाभतो आहे. मासे विक्री करण्याबरोबरच बायप्रॉडक्ट निर्मितीतून वर्षभर रोजगार उपलब्ध होणार असल्याने रोजगारात वाढ होऊन या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. पालघर जिल्ह्याच्या उत्तरेला ३५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून किनारी भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. ओल्या माशांसह सुक्या मच्छीची बाजारपेठ म्हणून या भागाची विशेष ओळख निर्माण झाली आहे. आॅक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात धाकटी डहाणू येथे सुमारे ५० एकर जागेत १० ते १२ लाख किलो सुके बोंबील विक्र ीसाठी तयार होतात. त्यासह आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि झाई येथून कोलीम, शिवंड, पापलेट, घोळ, दाढा आदि विविध मासे प्रसिद्ध आहेत. शिवाय मागील पंधरा वर्षांपासून गोड्यापाण्यातील कोळंबी शेतीचे क्षेत्र विस्तारले आहे. या माशांची निर्यात देश-विदेशात होते तशी त्यांची विक्री स्थानिक बाजारातही होते. पावसाळ्यातील मासेमारी बंदी काळात कोळी बांधवांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. त्यामुळे कुटुंबियांवर हलाखीची परिस्थिती ओढावते. त्यामुळे सुक्या माशांवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगाचे प्रशिक्षण महिलांना दिल्यामुळे त्यातून त्यांना दीर्घकाळ रोजगार मिळणार आहे. डहाणू आणि बोर्डी हा परिसर पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला आला आहे. शिवाय सरस महोत्सव, बीच फेस्टिवल, चिकू महोत्सव आणि स्थानिक यात्रा, आठवडे बाजार या मधून येथील चिकू फळापासून बनविलेल्या पदार्थांना मोठी मागणी आहे. त्याधर्तीवर आगामी काळात ओल्या आणि सुक्या मच्छीपासून बनविण्यात येणारी लोणची, चटण्या तसेच विविध पदार्थांना हमखास बाजारपेठ मिळेल.राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन यांच्या सहकार्याने केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्थेच्या प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सदर प्रशिक्षणाला महिला बचत गटांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. चिखले आणि आगर गावात डॉ. अहमद बालंगे, भानूदास फंडे, कृणाली तांडेल, संतोष मोधळे धोंडू गायकवाड यांनी प्रात्यक्षकातून माहिती दिली.
डहाणूत मच्छीपासून मूल्यवर्धित पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण
By admin | Published: June 18, 2017 1:56 AM