वसई : वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बस शनिवारी सकाळी भरकटून एका घराच्या कंपाऊंड वॉलला जोरदार धडक दिली. सुदैवाने यात कोणालाही गंभीर इजा झाली नस्ली तरी सदर बस चालक दारू पिऊन बस चालवित असल्याचे लक्षात येताच, प्रवासी व गावकऱ्यांनी त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले.शनिवारी सकाळी वसई -विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या नालासोपारा-नाळा या मार्गावर सकाळी ९:३० वाजता बस प्रवास सुरू असताना अचानक ती दिशाहीन होऊन नानभाट गावात शिरून एका घराच्या वॉलकंपाउंडला धडकली. चालक भागवत हरी हाके याने इतकी दारू प्यायली होती की, त्याला शुद्ध नव्हती. बस थांबल्यानंतर बसमधील प्रवासी घाबरून बस मधून उतरले. मात्र चालक भागवत नशेत धुत होता. याबाबत नालासोपारा पोलिसांना कळविल्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेले व बस पोलिस ठाण्यात नेली. परिवहन सभापती प्रितेश पाटील यांनी पोलिस ठाण्यात जाऊन चालकाला पुढील चौकशी होईपर्यंत बडतर्फीची नोटीस हाती दिली. इतर दोन जणांवरही निलंबनाची कारवाई होणार आहे.सुदैवाने या परिसरात शाळेला सुट्टी असल्यामूळे कोणताही दुदैवी प्रकार घडला नाही. मात्र या घटनेची गंभीर दखल परिवहनने घेतली असून सदर चालकाला निलंबित करण्यात आले आहे. पालिकेची परिवहन सेवा मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालविली जात असून या ठेकेदाराने नेमणूक केलेल्या अनेक चालकांबद्दल तक्र ारी आहेत. गेल्या महिन्यात भूईगाव येथील एका महिलेचा परिवहनच्या बसखाली सापडून मृत्यू झाला होता. याबाबत पर्यावरण संवर्धन समितीतर्फे पालिका मुख्यालयासमोर श्रद्धांजली कार्यक्र मही घेतला गेला होता.याप्रकरणी स्टॅण्ड इन्चार्ज व कंडक्टर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगीतले, महापालिका आयुक्त बळीराम पवार यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही. तर परिवहनचे ठेकेदार मनोहर सकपाळ अजुन कोकणात होळीसणानिमीत्त सट्टीवर गेल्याचे सांगण्यात आले.सदर चालकावर कामावर असताना मद्यप्राशन करून बस चालविल्याप्रकरणी २४ मार्चपासून पुढील चौकशी होईपर्यंत बडतर्फीची नोटीस बजावली आहे.- तुकाराम शिव भक्त, आगार प्रमूख
पालिकेची परिवहन बस भरकटली; चालकावर बडतर्फीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:57 PM