वसई : नागरीकांची होणारी गैरसोय सहन न झाल्याने श्रमजीवी कामगार संघटनेने परिवहन कामगारांचा संप मागे घेतल्याचे जाहिर केले. दहा बडतर्फ कामगारांना एका महिन्यात कामावर घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेतल्याचे जाहिर करण्यात आले.गेले दहा दिवस सुरु असलेला परिवहन संप अखेर बुधवारी संध्याकाळी मागे घेण्यात आला. ठेकेदाराने मनमानी धोरण अवलंबून जनतेला वेठीस धरले होते. मागण्या मान्य करुनही शब्द पाळला नसल्याने मिटलेला संप पुन्हा सुुरु होऊन चिघळला होता. मात्र, प्रवाशांची गैरसोय सहन होत नसल्याचे सांगून हा संप मागे घेत असल्याचे पंडित यांनी सांगितले. निलंबीत दहा कामगारांना एका महिन्यात कामावर घेतले जाईल. या सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांच्या शब्दावर विश्वास टाकून संप मागे घेत आहोत, असे पंडित यांनी सांगितले. अजीव पाटील यांनी आश्वासित केल्यानुसार दहा बडतर्फ कामगारांना एका महिन्यात चौकशी पूर्ण करून कामावर घेतले जाणार आहे. तोवर त्या कामगारांना वेतनही दिले जाणार आहे. या मुद्याला मान्यता देऊन वादावर पडदा टाकला असल्याचे पंडित यांनी सांगितले.हा पराभव आम्ही स्वीकारला आहे. मात्र, हा सत्याचा तात्पुरता झालेला पराभव असून या कामगारांना न्याय मिळाला नाही तर प्राणपणाची लढाई लढायलाही मी मागे हटणार नाही, असा इशारा पंडित यांनी दिला आहे.१४ आॅगस्टला किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी परिवहन सेवा कामगारांनी संप पुकारला होता. कोणताच तोडगा निघत नसल्याने विवेक पंडित यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी यांच्याशी चर्चा झाल्यावर सतीश लोखंडे यांनी ठेकेदार आणि पंडितांशी चर्चा केली होती. त्यामुळे संप मिटला होता. मात्र, दहा बडतर्फ कामगारांना पुन्हा कामावर घेण्यावरून वाद होऊन संप चिघळला होता.
परिवहनचा संप मिटला, बडतर्फ कामगारांना एका महिन्यात कामावर घेण्याचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 3:13 AM