शशी करपे/ वसईमुंबईत वाहतूक पोलिसांकडून सुरु असलेली हप्तेखोरी थेट मुंबई हायकोर्टात पोचल्यानंतर आता वसईतील वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीविरोधात रिक्शा संघटनांचे प्रतिनिधी आता खाजगीत सविस्तर माहिती देऊ लागले आहेत. त्यावरून वसई तालुक्यात असलेले अवघे पन्नास वाहतूक पोलीस महिन्याला किमान पन्नास लाखांहून अधिक रक्कम वसूल करीत असल्याचा आकडा उजेडात आला आहे. बेकायदा रिक्षा वाहतूकीमुळे त्रस्त झालेल्या रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांविरोधातच दंड थोपटले आहेत. बेकायदा रिक्शा वाहतूकीला वाहतूक पोलीस जबाबदार असून हप्ता दिला नाही तर कारवाई केली जाते असा थेट आरोप ठाणे जिल्हा आॅटो रिक्षा टॅक्सी चालकमालक संघटनेचे उपाध्यक्ष खालीद शेख यांनी नोव्हेंबर महिन्यात करून खळबळ उडवून दिली होती. आता रिक्शा चालक मालक मित्र मंडळाचे विरार अध्यक्ष प्रेमकुमार गुप्ता यांनीही असाच आरोप करणारे निवेदन पालघर जिल्हा पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांना दिले आहे. त्यानंतर रिक्षांसह विविध वाहनांकडून जमा केली जाणारी रक्कम वसईत चर्चेचा विषय बनली आहे. वसई तालुक्यात सुमारे १५ हजार रिक्षा परवाने आहेत. मात्र येथे टप्पा प्रवासी वाहतुकीचा परवाना नसताना, अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या टाटा मॅजिक, खाजगी बसेस, नोंदणी रद्द झालेल्या रिक्षा, खाजगी रिक्षा मोठ्या प्रमाणात चालत आहेत. त्याचबरोबर कागदोपत्री मोडीत निघालेल्या किमान दोनशेहून अधिक रिक्षा तालुक्यात सर्रासपणे प्रवासी वाहतूक करीत आहेत. यामुळे अधिकृतपणे शासनाला कर भरणाऱ्या व वेळोवेळी पासिंंग करणाऱ्या रिक्षा चालकांच्या व्यवसायावर गंडातर आले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची तक्रार संघटनेने केली आहे. नियमित कर भरणाऱ्या रिक्षा चालकांचा यामुळे व्यवसाय होत नाही व रिक्षासाठी बँकेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. परिणामी बँकेवाले रिक्षा जमा करून घेत आहेत, अशी रिक्षाचालकांची व्यथा आहे.वसईतील एसटी डेपोच्या प्रवेशद्वारासमोर वाहतूक पोलिसांच्या आशिर्वादाने, रिक्षा तळ सोडून दररोज शेकडो रिक्षाचालक प्रवासी भरतात. याचा एस.टी. बसेसना आत-बाहेर जाण्यास त्रास होतो. अधिकृतपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना देखील याचा त्रास सहन करावा लागतो. वसई वाहतूक विभागामार्फत मोटार वाहन कलम २०७ चा सर्रासपणे गैरवापर केला जात आहे. कलम २०७ अंतर्गत नोटीस अपवादात्मक परिस्थितीत म्हणजेच ज्या रिक्षा चालकांकडे लायसेन्स बॅज नसेल गाडीची फीटनेस, आर.सी.बुक व परमीट नसेल अशांनाच ही नोटीस देऊन रिक्षा जमा करण्याचा अधिकार आहे. मात्र वाहतूक विभागाने ए.टी.एम. पावती असताना जे रिक्षा चालक मासिक हफ्ता देत नाहीत अशांना त्रास व्हावा त्याचा व्यवसाय बुडावा व कंटाळून त्याने वाहतूक विभागाला हप्ता सुरू करावा म्हणून कलम २०७ ची नोटीस देऊन चालकांची रिक्षा जप्त केली जाते. त्यामुळे व्यवसाय बुडतो, अशी तक्रार करण्यात आली आहे.धक्कादायक बाब म्हणजे वसई वाहतूक शाखेत तीन अधिकारी आणि पन्नास पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. अधिकारी बदलत असले तरी कित्येक कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक शाखेत ठाण मांडून बसलेले आहेत. यातील वजनदार कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून क्रीम समजल्या जाणाऱ्या २५ पॉर्इंटवर अविरतपणे सेवा बजावत आहेत. अगदी कमी संख्याबळ असलेली वाहतूक शाखा महिन्याला पन्नास लाखांहून अधिक कमाई करीत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. वाहतूक शाखेवर थेट पोलीस अधिक्षकांचे नियंत्रण असल्याने या खात्यात आलबेल कारभार सुरु आहे. वाहतूक पोलीस सकाळी ९ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ७ या दरम्यान पॉर्इंटवर आढळून येतात. मात्र, वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी कोपऱ्यात बसून राहण्यापलिकडे काहीच काम करताना दिसत नाहीत. अशी होते राजरोस हप्त्यांची वसुलीविरार आणि नालासोपारा शहरात सध्या दोनशेहून अधिक मॅजिक व्हॅन बेकायदेशिरपणे व्यवसाय करीत आहेत. त्या प्रत्येकाकडून दोन हजार प्रमाणे महिन्याला चार लाख रुपये जमा केले जातात. ड्रायव्हरकडे लायसन्स, बॅज आणि रिक्षा परवाना नसलेल्या तालुक्यात तीन हजार रिक्षा असून प्रत्येकाकडून महिन्याला एक हजार रुपयेप्रमाणे तब्बल तीस लाख रुपये गोळा केले जातात. खाजगी आणि कालबाह्य अशा किमान ५०० रिक्षा वसईच्या रस्त्यावर धावतअसून त्यांच्याकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे दर महिन्याला १० लाख रुपयांचा मलिदा वाहतूक पोलिसांना मिळतो. वसईत एकही रिक्षा मीटरनुसार व्यवसाय करीत नाही. काही ठिकाणी शेअर रिक्षांना परवानगी दिली गेली आहे. मात्र, शेअर रिक्षांमधून किमान पाच प्रवाशी वाहून नेण्याची परंपरा आजही सुरु आहे. त्यामुळे ओव्हरसिट चालवल्या जाणाऱ्या रिक्षांकडून वाहतूक पोलिसांना महिन्याकाठी दहा लाखाच्या आसपास मलिदा मिळतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याचबरोबर टँकर, वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो, स्कूल बस, खाजगी बस, यांच्याकडून दरमहा मिळणारा हप्ता वेगळा असतो. हप्ते गोळा करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी झिरो पोलिसांची नेमणूक केली असून त्यांची पोलिसांपेक्षा अधिक दादागिरी सुरु असताना दिसून येते. पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे रिक्शाचालक त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक्षकांकडे रितसर तक्रार करण्यात आलेली आहे. पण, कोणतीच कारवाई केली जात नाही.- प्रेमकुमार गुप्ता, अध्यक्ष, रिक्षा चालक मालक मित्र मंडळ, विरार रिक्षा संघटनांचे आरोप बिनबुडाचे आहेत. काहींच्या वेगळ्या अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नसल्याने असे आरोप केले जातात. आमच्याकडे अवघे ५० पोलिसांचे संख्याबळ आहे. असे असतानाही वाहतूक शाखा चांगले काम करीत आहे.-रणजित पवार, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
वसईतही वाहतूक पोलिसांची हप्तेखोरी
By admin | Published: January 09, 2017 6:21 AM