भार्इंदर : बाजार कराची वसुली निश्चित दरापेक्षा अधिक करून त्याची पावती न देताच कराचा परस्पर अपहार करणाऱ्या पालिकेतील शिपायाला ठाणे एसीबी (अॅण्टी करप्शन ब्युरो) ने रविवारी (२६ जुलै) दुपारी रंगेहाथ पकडले आहे. या शिपायाचे नाव राकेश कारभारी त्रिभुवन (२५) (रा. भार्इंदर पूर्व) असे असून तो पालिकेत कार्यरत आहे. पालिकेने तत्कालीन महासभेच्या मान्यतेने प्रतिपावतीप्रमाणे २५ रु. दर बाजार करासाठी निश्चित केला आहे. त्याचा ठेका स्थानिक ठेकेदारांना लिलाव पद्धतीने देण्यास सुरुवात केल्यानंतर काही ठेकेदारांनी पालिकेत जमा केलेल्या अनामत रकमांपेक्षा जास्त दराने कराच्या वसुलीस सुरुवात केली. कराच्या जादा वसुलीमुळे ठेकेदार गब्बर होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांच्यावर कारवाई करणे दूरच उलट ठेक्याची रक्कम वाढविण्यास प्रशासनाने सुरुवात केली. आता पालिकेकडूनच कर वसूलीस सुरुवात करण्यात आली असून त्यासाठी काही शिपायांना नियुक्त केले आहे. या कर्मचाऱ्यांनाही ठेकेदाराच्या जादा वसुलीसह वसुलीची पावती न देण्याचे व्यसन जडले. कराच्या जादा वसुलीविरोधात भार्इंदर पश्चिमेकडील एका फेरीवाल्याने ठाणे एसीबीकडे तीन आठवड्यांपूर्वी तक्रार केली होती. एसीबीने रविवारी आठवडाबाजारात सापळा लावला असता त्यात राकेश याला रंगेहाथ अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)
पालिकेतील शिपाई एसीबीच्या जाळ्यात
By admin | Published: July 27, 2015 11:01 PM