डहाणू : शासनाने ५४ लाख रुपये खर्च करून उभारलेले ट्रॉमा सेंटर सध्या धूळखात पडले आहे. त्या अभावी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आणि परिसरात अपघातात जखमी झालेल्या अनेकांचे प्राण जात आहेत. परंतु त्याची कोणतीही तमा आरोग्ययंत्रणेला नाही. झपाट्याने लोकसंख्या वाढत असलेल्या डहाणू तालुक्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. येथे एकही सुसज्ज व अद्यावत शासकीय रूग्णातय नसल्याने हजारो गोर-गरीब आदिवासी तसेच सर्वसामान्यांना विविध आजारावर उपचार घेण्यासाठी तसेच अपघतात गंभीर जखमी झालेल्या रूग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी येथील नागरिकांना रात्री बेरात्री नाईलाजाने गुजरातमधील सिल्व्हासा बलसाड, वापी तसेच नवसारी येथील रूग्णालयात धाव घ्यावी लागते. गेल्या वर्षभरापासून केंंद्र शासनाने ट्रॉमा केअर सेंटरसाठी ५४ लाख रूपयांचा निधी दिला, त्याची सुसज्ज अशी इमारत डहाणू येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या शेजारी बांधून दिली. त्याला वर्षभराचा कालावधी झाला परंतु वीज, पाणी तसेच इतर सोयी सुविधा नसल्याचे कारण पुढे करून उपजिल्हा रूग्णालय त्याचा ताबा घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने ट्रॉमा सेंटर वर्षभरापासून धूळखात पडले आहे.साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात एकूण नऊ प्राथमिक आरोग्य केंदे्र आहेत. तर ६० उपकेंद्रे असून कासा येथील पन्नास खाटांच्या तर डहाणू येथील शंभर खाटांच्या उपजिल्हा रूगणालया बरोबरच वाणगाव येथे ग्रामिण रूग्णालय आहे. परंतु असंख्य प्रा. आरोग्य केंद्रात वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने खेडोपाडयातील रूग्ण मोठया आशेने डहाणूच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल होतात. परंतु येथे ही सिटीस्कॅन, सोनोग्राफी, डायलिसीस तसेच रात्री बेरात्री रक्ताची गरज भासल्यास ते तालुक्यात उपलब्ध होत नसल्यांने रूग्णांची व त्यांच्या आप्तांची धावपळ होते. त्यामुळे गर्भवती महिलां प्रमाणे अपघातात गंभीर जखमी झालेल्या रूग्णाला घेऊन वापी, सिल्व्हासा येथील विनोबा भावे रूग्णालयात घेऊन जाण्याची वेळ येते.डहाणू तालुक्यातील आदिवासी तसेच सर्वसामान्यांसाठी कासा येथील उपजिल्हा रूग्णालय तसेच डहाणू येथील उपजिल्हा रूग्णालयाचा मोठा आधार आहे. येथे दररोज २०० ते ३०० च्या आसपास बाह्यरूग्ण तपासणीसाठी खेडोपाडयातून येत असतात. परंतु एखाद्या गंभीर आजाराची तपासणी करण्यासाठी तसेच आगीत व अपघतात गंभीर जखमी झालेल्या रूग्णावर तातडीने शस्त्रक्रिया किंवा उपचार करण्यासाठी लागणाऱ्या आधुनिक वैद्यकीय साधन सामुग्री व औषधाचीही वानवा असते. आदिवासी व आर्थिकदृष्टया मागासलेल्या रूग्णांची यामुळे प्रचंड गैरसोय होत असते. खाजगी हॉस्पिटलची भरमसाठ फी देण्यासाठी त्यांना अनेकदा कर्जबाजारी व्हावे लागते. अगर उसनवारी करावी लागते काहीजण रोग परवडला, पण उपचार नको या भावनेतून आजारवर उपचारच करीत नाही. परिणामी अनेकांना जीव गमवावा लागतो. एखाद्या अपघातात हात, पाय, फॅक्चर झालेल्या रूग्णांना खाजगी रूग्णालयात साठ ते सत्तर हजाराचा खर्च करावा लागतो. परंतु सर्व सोयी सुविधेने युक्त असलेल्या सिल्व्हासायेथील विनोबा भावे रूग्णालयात मोठ मोठया शस्त्रक्रिया आठ ते दहा हजारात होत असल्याने डहाणू तालुक्यातील ९० टक्के रूग्ण याच रूग्णालयाचा आधार घेत असतात. दरम्यान ५४ लाख रूपये खर्च करून डहाणूत बांधण्यात आलेले ट्रामा केअर सेंटर वापराविना धूळ खात पडले आहे. (वार्ताहर)अशीही टोलवाटोलवीसार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या वर्षभरापासून उपजिल्हा रूग्णालय डहाणू तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग (पालघर) यांना अनेक पत्र लिहून ट्रामा केअर सेंटर चा हस्तांतरण करण्याबाबत असंख्या स्मरणपत्रे दिली आहेत. परंतु वीस खाटांच्या ट्रॉमा सेंटरमध्ये फिमेल वॉर्डाची क्षमता कमी आहे. आयसीयू कक्षामध्ये दोन खाटा बसविणे गरजेचे आहे. वैद्यकीय अधिकारी, नर्स रूम तसेच स्टोअर रूम, आॅपरेशन कक्ष बांधण्यात आलेले नाही. असे कारण पुढे करून ते ताब्यात घेण्यास चालढकल करीत आहेत.
ट्रॉमा सेंटर वर्षभर धूळखात
By admin | Published: May 01, 2017 5:48 AM