विक्रमगड : दोन ते तीन महिन्यांपूर्वी परतीच्या वारा - पावसाने जांभा येथील कुवरपाडा जि.प. शाळेच्या इमारतीवर झाड पडून छतावरील सिमेंट पत्रे फुटून बरेच नुकसान झाले. मात्र, बरेच दिवस होऊनही शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग आणि जांभा ग्रामपंचायतीने अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही.
येथे पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत असून छतावरील काही सिमेंट पत्रे फुटल्याने या परिस्थितीतच विद्यार्थ्यांना शाळेतील बाजूच्या इमारतीत बसून शिक्षण घ्यावे लागते आहे. पालकांनी ग्रामपंचायत ग्रामसभेत प्रस्ताव मांडून या शाळेतील इमारतीवरील फुटलेले सिमेंट पत्रे नवीन टाकण्याचा ठराव करूनही याकडे ग्रामपंचायतीने लक्ष दिलेले नाही.
दरवर्षी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३० ते ४० शाळांच्या दुरूस्तीसाठी मंजुरी मिळते. पंरतु, ज्या शाळांना मंजुरी मिळायला हवी, त्यांना मिळत नाही, त्यामुळे अशी परिस्थिती ओढवते.
शाळेचे अंदाजपत्रक तयार करून शिक्षण विभागाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. पंरतु ते मंजूर झालेले नाही, अशी माहिती शाखा अभिंयत्यांनी दिली. खरे तर अंदाजपत्रक दिले असतानाही मंजुरी मिळाली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.