पालघर : रविवारी दुपारी पालघरहून डहाणूकडे जाणारी लोकल कोळगाव फाटकाजवळ आली असताना मोठे झाड तिच्यावर कोसळले. मोटरमनने तत्काळ ती थांबविल्याने जीवितहानी टळली. लोकल रविवारी पालघर येथून दुपारी १२ वाजून ४८ वाजता सुटली. ती काही अंतरावर पोहचली असता जोराचा पाऊस आल्याने प्रवाशांनी डब्याचे दरवाजे, खिडक्या बंद केल्या. कोळगाव फाटक पार केल्यानंतर रुळाजवळील मोठे झाड लोकलच्या मध्यभागी कोसळले. या वेळी मोठा आवाज होऊन लोकलला हादरे बसल्याचे प्रवासी सत्यवान सापने यांनी लोकमतला सांगितले. प्रसंगावधान राखून मोटरमनने गाडी थांबवली आणि झाड हटविण्यासाठी संबंधित यंत्रणेला कळवले. हे झाड हलविण्यासाठी ३५ ते ४० मिनिटांचा कालावधी लागल्याने लोकल डाऊन बाजूला उभी होती. यावेळी विरार बाजूने आलेल्या अन्य लोकलसह काही गाड्या डाऊन साईड वर उभ्याच राहिल्याने काही काळासाठी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.
डहाणूकडे जाणाऱ्या लोकलवर झाड कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 6:01 AM