शहापूर/मुरबाड : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण तालुक्यांमध्ये आदिवासी वेठबिगार मजुरांचे रोजगारासाठी हजारोंच्या संख्येने स्थलांतर सुरु झाले आहे. पालघरच्या मोखाडा, वाडा, जव्हार, विक्र मगड, तलासरी तर ठाणेच्या मुरबाड, कल्याण, भिवडीतील लाखो आदिवासी मजूर भाकरीच्या शोधात मुंबई, नाशिक, नवी मुंबईसह गुजरातमध्ये स्थलांतराच्या वाटेवर आहेत. एकट्या शहापूर तालुक्यात आतापर्यंत पंधरा हजार विटभट्टी मजुरांचे स्थलातर झाले आहे. विशेष म्हणजे आदिवासी विकास प्रकल्प विभाग व तहसिलदार कार्यालयाने अद्यापी या स्थलांतराची साधी दखलही घेतलेली नाही. शिवाय स्थलांतरीतांची अधिकृत आकडेवारीच या सरकारी कार्यालयांकडे नसल्याचे धक्कादायक वास्तव या निमित्ताने उजेडात आले आहे. आदिवासी मजुरांचे रोज शेकडोंच्या संख्येने सर्वाधिक स्थलांतर शेजारच्या पालघर जिल्ह्यातून सूरु आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा हे पूर्वाश्रमीच्या ठाणे जिल्ह्यातीलच असूनही मागच्याच वर्षीचे स्थलांतराचे चित्र या वर्षी देखील येथे कायम आहे. गेल्या काही वर्षात महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना व २०१५ मध्ये राबविली जात असलेली जलशिवार योजना ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात पुरत्या अपयशी ठरल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकारी धोरण असूनही आदिवासी मजूरांना राहत्या गावांतच हाताला काम उरलेले नसून स्थलांतर रोखण्यासाठीच्या सरकारी उपाय योजना फक्त कागदावरच आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर आहे. अशा मुलांचा शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून स्थलांतराच्या ठिकाणी शाळेत समावेश करण्याची शासन योजना असली तरी मागील काही वर्षांचा इतिहास पाहता शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचितच आहेत. आदिवासी आश्रमशाळा व जिल्हा परिषद शिक्षण विभागाची शाळाबाह्य विद्यार्थ्यासाठीची मोहीम अक्षरश: तकलादु ठरत आहे.
भाकरीच्या शोधात आदिवासी शहरांकडे
By admin | Published: November 22, 2015 12:16 AM