बोर्डी : डहाणू तालुक्यात गंजाड ग्रामपंचायत हद्दीतील नवनाथ येथे सुरुंग स्फोटांमुळे मोठे दगड उडून जवळच्या लोकवस्तीत पडल्याने आदिवासींच्या घरांना भगदाड पडून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून नुकसानभरपाई आणि काम सुरू करण्यापूर्वी सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
मुंबई-बडोदा राष्ट्रीय द्रुतगती महामार्गाचे काम सुरू असून बोअर मशिनचा वापर करून प्रचंड क्षमतेचे भूसुरुंग स्फोट केले जात आहेत. मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास भूसुरुंग स्फोटाने गंजाड गावातील कोहराळीपाडा हादरला.या स्फोटामुळे मोठे दगड उडून घरांवर पडल्याने पत्रे आणि कौले फुटली, तर टीव्ही, कपाट, फॅन, भांडी आणि आदी साहित्याचे नुकसान झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्फोटाने उडालेले दगड वीज वाहिन्यांवर पडल्याने तारा तुटून संपूर्ण पाड्यावरील वीजपुरवठा ठप्प झाला.
भूसुरुंग स्फोटांमुळे राहत्या घरांचे मोठे नुकसान झाल्यामुळे कोहराळी पाड्यातील आदिवासी कुटुंबे प्रचंड दहशतीखाली असून संपूर्ण नुकसानभरपाई तसेच ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करून काम सुरू करायचे असल्यास सुरक्षेची हमी द्यावी, त्यानंतरच काम सुरू करावे, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. डोंगर फोडण्यासाठी भूसुरुंग स्फोट केल्यास १०० मीटर अंतरावरील घरांना धोका असल्याचे कोहराळी ग्रामस्थांनी गंजाड ग्रामपंचायतीला पत्राद्वारे कळवले होते.
त्यामुळे या भागात भूसुरुंग स्फोटांना परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र ग्रामपंचायतीने त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे, तर नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवल्याचे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.
गंजाड गावच्या नवनाथ येथे भूसुरुंग स्फोटाने काही घरांचे नुकसान झाले असून घरांचे पंचनामे मंडळ अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात येणार आहे. - अभिजित देशमुख, तहसीलदार, डहाणू