पालघर : दसऱ्याला रावण दहणाच्या कार्यक्रमाला आदिवासी संघटनांकडून होणारा वाढता दबाव पाहता पालघर जिल्ह्यातील रावण दहणाचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पालघरच्या आर्यन शाळेच्या मैदानावर रावण दहणाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे पार पाडण्यासाठी सहयोगी मित्र मंडळ,पालघर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रशासनाची प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षी ही परवानगी मागितली होती. परंतु आदिवासी संघटनानी आक्रमक भूमिका घेत रावण हे आमचे दैवत असल्याचे कारण पुढे करत दसऱ्याला होणाऱ्या रावण दहणाच्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
आदिवासी संघटनांनी तर रावण दहन करणाऱ्यांवर अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी धमकीही दिली आहे.पोलिसांनी रावण दहन करण्याची परवानगी नाकारल्याने आणि आदिवासी संघटनांच्या आक्रमक भूमिका पाहता आयोजकावर हा कार्यक्रमच रद्द करण्याची पाळी ओढवली आहे.