शेणवा : ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या शहापूर प्रकल्प विभागाच्या कार्यालयाची इमारत निकृष्ट बांधकामामुळे कोसळण्याची भीती आहे. या कार्यालयात अक्षरश: जीव धोक्यात घालून अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत. स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये इमारत धोकादायक झाल्याचे उघडकीस झाल्याने कार्यालयात एकच घबराट पसरली आहे. हे कार्यालय त्वरित हलविण्याच्या हालचाली सुरु आहेत.
२०१० मध्ये आदिवासी विकास विभागाच्या निधीतून लाखो रु पये खर्च करून बांधण्यात आलेल्या या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम अभियंता व कंत्राटदाराने हे बांधकाम दर्जेदार न करता निकृष्ट केल्याने या इमारतीची नऊ वर्षातच पडझड झाल्याचे समोर आले आहे. निकृष्ट बांधकामामुळे भिंतींना भेगा पडल्या आहेत. इमारतीसाठी वापरण्यात आलेले स्टीलही गंजले आहे. भिंतींना तडे गेले आहेत. भिंतीचे प्लास्टर बांधकाम सोडून ठिकठिकाणी निखळले आहे. इमारतीच्या स्लॅबला गळती लागली आहे. अशा धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन कर्मचारी येथे काम करीत आहेत. ही इमारत धोकादायक झाल्याचे स्ट्रक्चरल आॅडिट झाल्यानंतर समोर आले.
या नंतर तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी ठाणे आदिवासी विभागाच्या अपर आयुक्तांना पत्र देऊन शहापूर आदिवासी प्रकल्प विभागाची इमारत धोकादायक असल्याचे कळविले. त्यानंतर इमारत रिकामी करून या कार्यलयाचे कामकाज करण्यासाठी भाडेतत्त्वावर इमारत मिळावी याबाबत आदिवासी प्रकल्प अधिकारी अरूणकुमार जाधव यांनी अपर आयुक्तांकडे मागणी केली आहे. दरम्यान, लवकरच हे कार्यालय भाड्याच्या इमारतीत स्थलांतरीत होणार आहे. यासाठी हजारो रु पये भाड्यापोटी आदिवासी विभागाच्या तिजोरीतून खर्च होणार आहे.