अनिरुद्ध पाटील बोर्डी : तलासरी तालुक्यातील झाई ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत ब्राह्मण-गावच्या नागरपाड्यावरील प्रवीण देवजी गुजर या आदिवासी युवकाने बोरीगाव घाटालगतच्या डोंगरमाथ्यावर मळा फुलवला आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला येथे आधुनिक शेतीचा प्रयोग राबवायचा आहे.
महाराष्ट्र-गुजरात सीमेवर झाई-बोरीगाव ग्रुप ग्रामपंचायत असून ब्राह्मणगाव येथे प्रवीण आई-वडील, तीन भाऊ आणि एक बहीण या कुटुंबासोबत राहतो. बोरीगाव घाटानजीकच्या डोंगरमाथ्यावर शासनाकडून वनहक्क कायद्यातून तीन एकरांचा वनपट्टा या कुटुंबाला मिळाला आहे. त्याचे वडील खरीप हंगामात भाजीपाला लागवड करायचे. मात्र, खडकाळ जमिनीतून हाती काहीच लागत नव्हते. दरम्यान, प्रवीणने कोसबाडच्या महात्मा गांधी आदिवासी जनता विद्यालयात नुकताच कृषी पदविका अभ्यासक्र म पूर्ण केला आहे. येथील ज्ञानाचा वापर करत त्याने ४० गुंठ्यांवर पडवळ, कारली, वालुक (काकडी) या वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड केली. त्यामुळे भरघोस उत्पादनाला सुरुवात झाली आहे. प्रतिदिन १०० किलो उत्पादन निघते. त्याची आई शांतीबाई हा माल सीमेलगतच्या उंबरगाव रेल्वेस्थानकानजीक विक्रीसाठी घेऊन जाते. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला असल्याने हातोहात त्याची विक्री होत असल्याचे त्या म्हणाल्या. मुलाला आवडीचे शिक्षण दिल्याने कुटुंबाला रोजगार उपलब्ध झाल्याने समाधानाची भावना त्याच्या पालकांनी व्यक्त केली आहे.आदिवासी समुदाय पावसाळ्यात डोंगरउतारावर शेती करतो. येथे दिवसभर गुरे चारणे, हा त्यांचा दिनक्र म असतो. त्या वेळी भूक आणि पाण्याची गरज भागावी म्हणून वालुक (काकडी) लागवड केली जाते. या काकडीला आदिवासी समाजाच्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.बाळासाहेब कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कोसबाड येथील या जनता विद्यालयात लेखीसह तोंडी आणि प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षण दिले जाते. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी स्वत:चा रोजगार उभा करण्यास सक्षम बनतो, हे प्रवीणच्या उदाहरणातूनही दिसते.- चेतन उराडे, कृषी सहायक, महात्मा गांधी आदिवासी जनता विद्यालय, कोसबाड