- रवींद्र साळवे मोखाडा - ‘मागेल त्याला काम आणि दाम’ या तत्त्वावर कार्यरत असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत काम करून वर्ष उलटून गेले तरीही प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे सूर्यमाळ ग्रामपंचायतीतील केवनाळे येथील आदिवासी मजुरांना केलेल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. मे २०१८ मध्ये केवनाळे येथील ५० ते ६० मजुरांनी १५ दिवस ग्रामपंचायत स्तरावर रस्त्याचे काम केले आहे. मात्र, आता एवढे महिने उलटून गेल्यानंतरही त्यांना मजुरी मिळालेली नसल्याने त्यांच्यामध्ये असंतोष आहे.मजुरीसाठी वारंवार पंचायत समिती कार्यालयात हेलपाटे मारूनही सरकारी बाबूंच्या अनावस्थेमुळे त्यांच्या पदरी निराशा पडते आहे. नेहमीच पैशाची चणचण भासणाऱ्या या आदिवासींना पदरमोड करूनही त्यांच्या हक्काचा मोबदला मिळत नाही. देयके वेळेत सादर न केल्याने त्यांना त्यांच्या हक्काच्या मोबदल्यापासून वंचित रहावे लागते आहे. या प्रकरणी मार्ग काढण्याची या मजुरांची मागणी आहे.रोहयोची अंमलबजावणी होत नसल्याने आदिवासींचे स्थलांतर?२००५ वर्षापासून रोजगार हमी योजनेची सुरुवात झाली. रोहयो मजुरांच्या मागणीनुसार वर्षभरात शासनाने रोहयो मजुरांना १०५ दिवस काम देणे बंधनकारक आहे. ‘मागेल त्याला पंधरा दिवसात रोजगार’ असे शासनाचे धोरण आहे. परंतु शासनाचा उद्देश यशस्वी होतांना दिसत नाही. यामुळे येथील आदिवासी रोहयो मजुरांचे स्थलांतर होते आहे. कायमस्वरूपी रोजगार मिळत नसल्याने, या आदिवासी ग्रामीण भागात अनेक समस्या निर्माण होवून भूकबळी, कुपोषण, दारिद्र्य, गरिबी या समस्या भेडसावत आहेत. जॉब कार्डधारक रोहयो मजुरांना ग्रामपंचायत स्तर, पंचायत समिती बांधकाम विभाग, तालुका कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, पाणलोट क्षेत्र, अशा रोजगार देणाºया यंत्रणा आहेत. मात्र एकाही मजुराला वर्षभरात १०५ दिवस काम मिळत नाही.कधी काम केले आहे, हे मला निश्चितरित्या सांगता येणार नाही. रोजगार सेवकाला विचारून सांगतो.- प्रकाश सूर्यवंशी, ग्रामसेवक,सूर्यमाळ ग्रामपंचायतकाम करूनही मजुरी वेळेवर मिळत नाही. आम्ही कुटूंब कसे चालवायचे. पंचायत समिती, तहसीलमध्ये हेलपाटे मारले. परंतु कुणी आमची दाद घेत नाही. - लक्ष्मण तेलम, वंचितयाबाबतची माहिती रोहयो विभागाकडून घेऊन चौकशी केली जाईल.- संगीता भांगरे, बीडीओ पंचायत समिती मोखाडा
केवनाळे येथील आदिवासींना मजुरी मिळेना, वर्ष झाले तरी रोहयोच्या मजुरीचा पत्ता नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 12:17 AM