नालासोपारा (मंगेश कराळे) :- रात्रीच्या वेळेला चाकूचा धाक दाखवून मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या त्रिकुटाला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे. या तिन्ही आरोपीकडून ५ गुन्ह्यांची उकल करून लाखो रुपये किंमतीचे १५ मोबाईल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण गोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.
मालजीपाड्याच्या पथरपाडा येथे राहणारे शबीर अहमद सिद्दिकी (४०) हे २९ जूनला त्यांचे घरामध्ये झोपलेले असताना आरोपीने त्यांचे दुकानाचे दरवाजाची कडी उघडुन घरामध्ये प्रवेश करुन त्यांना झोपेतुन उठवुन एका आरोपीने चाकुचा धाक दाखवुन तुझ्याकडील पैसे दे अशी धमकी देत त्यांच्या उशाखाली ठेवलेला मोबाईल, रोख रक्कम असा २० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये मुंबई गुजरात महामार्गावर पायी चालणाऱ्या एकटया व्यक्तीस हेरुन चाकुचा धाक दाखवुन मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल फोन आणि पैसे जबरीने काढुन घेण्याचे गुन्हे वारंवार घडत आहेत.
तपासादरम्यान गुप्त बातमी व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सापळा रचुन आरोपी अभय उर्फ बिल्ला उर्फ प्रिन्स विजेश शुक्ला आणि आरीफ महोम्मद सिद्दिकी यांना ताब्यात घेण्यात घेतले. आरोपीकडे गुन्हयाच्या अनुशंगाने चौकशी केली असता त्यांनी सातिवली गावदेवी मंदिर आणि काठीयावाडी ढाबा, तुंगारफाटा या ठिकाणांवर अंधारात उभे राहून एकटयाने पायी चालत प्रवास करणा-या व्यक्तींना हेरुन चाकुचा धाक दाखवुन मारहाण करुन त्यांचेकडील पैसे व मोबाईल चोरी केल्याचे आचोळे व वालीव पोलिस ठाण्यातील ४ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. तसेच नायगाव पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हयातील आरोपीच्या मिळालेल्या माहीतीवरुन आणि मोबाईलचे तांत्रिक विश्लषणाव्दारे शोध घेवून सापळा रचुन आरोपी जिग्नेश पोपट चित्ते याला ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्हयाच्या अनुशंगाने चौकशी केली असता आरोपीने नमुद गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तिन्ही आरोपीकडून जबरी चोरीचे ४ आणि उघडयावरुन चोरीचा १ असे एकुण ५ गुन्हे उघडकीस आणुन त्यांचे ताब्यातुन २ लाख १ हजार रुपये किंमतीचे १५ मोबाईल हस्तगत केले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त अविनाश अंंबुरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सपोनि सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदिश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांत ठाकुर, अमोल कोरे, सायबर शाखेचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.