- वसंत भोईर, वाडाभाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाची भात खरेदी योजना बारदाना (पोती) अभावी व नविन चलन उपलब्ध होत नसल्याने रखडली आहे. शेतकऱ्यांनी स्व:ताच्या बारदानांमधुन भात घेऊन यावे व नविन चलन उपलब्ध होईपर्यंत भाताची होणारी किंमत मागु नये या शर्तीवर सद्या महामंडळाच्या काही केंद्रांवर भात खरेदी सुरु आहे. काही शेतकऱ्यांनी महामंडळाच्या शर्ती मान्य करून भाताची विक्र ी सुरु केली आहे. तर महामंडळाने अजुन बऱ्याचशा केंद्रावर खरेदी सुरून केल्यामुळे अडलेल्या शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना मातीमोल दराने भाताची रोखीने विक्री करण्यास सुरवात केली आहे.आदिवासी विकास महामंडळांतर्गत पालघर जिल्ह्यात एकाधिकार व आधारभूत योजनांतर्गत भाताची खरेदी केली जाते. आधारभूत योजनेतर्गत जिल्ह्यात एकुण ३५ भातखरेदी केंद्र आहेत. तर एकाधिकार योजनेची एकुण २१ भात खरेदी केंद्र आहेत. नविन चलन व बारदाना अभावी या ५६ केंद्रावर महिनाभरात फक्त ३७०० क्विंटलच भाताची खरेदी झालेली आहे. आधारभूत योजनेंतर्गत जाडे भातासाठी १४७० रु पये प्रति क्विंटल असा दर असून यामध्ये प्रति क्विंटलला दोनशे रु पये वाढवून (बोनस) दिला जाणार आहे. तर एकाधिकार योजनेमध्ये खरेदी केल्या जाणाऱ्या भाताचा दर आधारभूत प्रमाणेच आहे, मात्र या योजनेमध्ये बोनस नसतो. मात्र, या खरेदी केंद्रांवर बारीक (लहान दाणा) भाताला १५१० रु पये दर दिला जाणार आहे. १००० व ५०० च्या नोटाबंदीमुळे व नविन नोटांचा चलनाचा अभाव असल्याने सध्या येथील सर्वच भात खरेदी केंद्रावर भाताची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना उधारीने भात द्यावे लागत आहे. त्याच प्रमाणे महामंडळाने बारदानाची उपलब्धता करून न दिल्यामुळे शेतकऱ्यांवरच बारदाणे खरेदी करुन भाताची विक्र ी करण्याची वेळ आली आहे. बारदानाची किंमत अवघी १० रुपये आज बाजारात रिकाम्या बारदानाचा दर २० ते २५ रुपये असताना भात खरेदी केंद्रावर महामंडळाकडून शेतकऱ्यांना फक्त १० रुपयेच दिले जात आहेत. बारदाने पुरविण्यासाठी नुकताच ई निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.लवकरच हा प्रश्न निकाली लागेल, तसेच सद्या बँकेमध्ये चलनाचा तुटवडा असल्याने हुंडीचे पैसै तात्काळ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना रोखीने पैसे देण्यास अडचण निर्माण होत आहे असे, आदिवासी विकास महामंडळ जव्हारचे प्रादेशिक व्यवस्थापक डी.एस.चौधरी यांनी सांगितले.दरम्यान, महामंडळाच्या केंद्रावर भात साठविण्यासाठी गोदामे अपूरे पडत असल्याने खरेदी थांबविली जाते, मात्र असे न करता संबंधीत केद्राजवळील शेतकऱ्यांची घरे गोदामासाठी भाड्याने घ्यावीत व विक्र ीसाठी आलेले शेतकऱ्यांचे सर्व भात खरेदी करावे. अशी मागणी वाडा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडूरंग पटारे यांनी केली आहे.
नवीन चलनाच्या टंचाईने भातखरेदी अडचणीत
By admin | Published: December 25, 2016 12:31 AM