- शौकत शेखडहाणू : येथील नगर परिषदेची निवडणूक चार दिवसांवर येऊन ठेपलेली असतांना सर्व पक्षांच्या तगड्या उमेदवारांनी जोर मारण्यास सुरूवात केली आहे. नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार असून नगरसेवक पदासाठी १०९ जण रिंगणात उतरले आहेत. वरकरणी ही बहुपक्षीय अन् अपक्षांची लढत वाटत असली तरी राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपा यांच्यातच खरी लढत असणार आहे.मतदानाची तारीख १३ वरुन १७ वर गेल्याने उमेदवारांना चांगलाच घाम फुटला असून पैशाचे गणित बसवता बसवता पुरेवाट होत आहे. डहाणू नगर परिषदेवर आजपर्यंत राष्ट्रवादीचे वर्चस्व राहील्याने शहा यांनी कामांचा ग्राफ मांडून भाजपापुढे आव्हान उभे केले असून पुढील पाच वर्षांमध्ये काय काम करणार याचा ब्लू-प्रिंट मतदारांपुढे मांडून घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, अपक्षांचा एलईडी टीव्ही च्या माध्यमातून चौकाचौकामध्ये हायटेक प्रचार सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे मतदारांना ऐकवून भाजपा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे तर राष्ट्रवादीने झालेल्या विकास कामांबरोबर भविष्यातील तरतुदींवर प्रचारात भर दिला आहे. शिवसेनेने स्मार्ट डहाणूचे स्वप्न मतदारांना दाखवले आहे. त्यामुळे डहाणू नगर परिषदेत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, बविआ यांच्यात पंचरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना स्मार्ट डहाणू करण्यासाठी सत्ता मागत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस विकासासाठी पुन्हा सत्तेची अपेक्षा करीत आहे. तर भ्रष्टाचार मुक्त डहाणू बनवण्यासाठी भाजप कौल मागत आहे.दरम्यान, शहरामध्ये निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून असंख्य वाहनांवरुन निवडणुकीचा प्रचार केला जात आहे. दूसरीकडे लग्नसराईत सुरु असल्याने डहाणूच्या रस्त्यांवर सर्वत्र वाहतूक ठप्प होताना दिसत आहे. वरपांगी जरी सत्ता आपल्यालाच मिळेल असे दावे सर्वपक्ष करीत असले तरी प्रत्येकाच्या मनात प्रत्यक्षात काय घडेल याबाबत धाकधूकच आहे.या सात उमेदवारांमध्ये चूरसनगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भरत राजपूत (भाजप), मिहीर शाह (राष्ट्रवादी काँग्रेस), संतोष शेट्टी (शिवसेना) अशोक माळी (काँग्रेस), दिलीप वळवी (बविआ) तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार डॉ. अमित नहार (अपक्ष), अनिल पष्टे (अपक्ष) अशा एकूण ७ उमेदवारामंध्ये चुरस आहे. खरी लढत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये होत आहे. मात्र मतदानाची दिनांक १३ वरु न १७ वर लांबणीवर गेल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा निवडणुकीच खर्च वाढला आहे. त्यामुळे खर्चावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
डहाणूत खरी लढत राष्ट्रवादी अन् भाजपातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 2:50 AM