वसई : केंद्रिय भूपृष्ठ मंत्रालयाने वाढवलेले शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे जातीने पाठपुरावा करणार असल्याची माहिती खासदार चिंतामण वनगा यांनी दिली. आॅटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक महासंघचे अध्यक्ष विजय खेतले यांनी याप्रकरणी खासदार वनगा यांना निवेदन दिले होते.केंद्रिय भूपृष्ठ व दळणवळण मंत्रालयाने भरमसाठ केलेली शुल्कवाढ ही सर्वसामान्य नागरिकांना अन्यायकारक वाटत आहे. ही शुल्कवाढ करताना, याबाबतचा मसुदा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला केला नव्हता. तथा या मसुद्या संदर्भाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली नव्हती. परिणामी, या मसुद्याबाबत कोणीही सूचना व हरकती दिलेल्या नाहीत त्यामुळे केंद्र सरकारने या मसुद्यात जी भरमसाठ वाढ सुचविली होती, ती तशीच्या तशी मंजूर केली. याविरोधात राज्यात रिक्षा चालकांनी आंदोलन करून आपला विरोध नोंदवला होता. वसईत एका कार्यक्रमाला आलेल्या खासदार वनगा यांनी विरार ते डहाणू या चार लाईनीकरीता साडेचार कोटींची तरतूद केल्याची माहिती दिली. वसई खाडीवर घाडबंदर येथे १०० ते १५० टनाच्या गाडयांची वाहतूक करता येईल, असा सुसज्ज ब्रिज बनवण्यात येणार असून त्याला मंजूरी मिळाली आहे. त्याचबरोबर वसईला पाईपद्वारे गॅस पुरवठा केला जाईल. वसई विरारमधील रेल्वे स्टेशनवर सोयीसुविधा पुरवण्यात येणार असल्याची माहितीही वनगा यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)
वाढीव रिक्षा शुल्क कमी करण्यासाठी प्रयत्नशिल
By admin | Published: February 15, 2017 4:25 AM