लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ/कणेरफाटा : कणेर फाटा येथे स्मशानभूमीत जाण्याच्या मार्गात पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणारे पकडलेले ट्रक उभे करून ठेवल्याने तो मार्ग बंद झाल्याने संतप्त आप्तांनी मृतदेह रस्त्यातच दहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी क्रेनचा वापर करून रस्ता मोकळा केल्याने त्या पार्थिवावर स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात आले व मोठा पेचप्रसंग टळला.अवैध रेती वाहतूक करताना पकडलेले ट्रक पोलिसांनी कणेर फाटा स्मशानभूमीकडे जाणारे रस्त्यावर उभे करून ठेवले होते. त्यामुळे पार्थिव स्मशानात न्यायचे कसे? हा प्रश्न नातेवाईकांसमोर उभा राहिला. त्यात दिवस पावसाचे त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी विरार वरून येणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद करून रस्त्यातच त्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु कणेर पोलिसांनी मध्यस्थी करून क्र ेनच्या मदतीने मार्ग मोकळा केल्यावर नातेवाईकांनी मार्गावर ठेवलेला मृतदेह उचलून स्मशान भूमीत अंत्यसंस्कार केले. कणेर गावातील अंकुश पारधी यांचे शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांनी कणेर पोलीस चौकीत येऊन तुम्ही स्मशानभूमीचा मार्ग मोकळा करा अशी विनंती केली. पण या ट्रकमध्ये बॅटरी नसल्याचे कारण देऊन त्याकडे काणाडोळा केला होता त्यामुळे हा तणाव निर्माण करणारा प्रकार घडला.
रस्त्यातच पार्थिवाच्या दहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 6:12 AM