पारोळ : विरार मधील यशवंत नगर परिसरातील लाविसा या सोसायटीतील दोन इमारतीत चड्डी बनियान गँगने दरोडा घालून १० तोळे सोने आणि चांदीची भांडी, दागिने असा २ लाख ७५ हजाराचा सोन्याचांदीचा ऐवज व काही रोख रक्कम लुटली. या सोसायटीत दोन वींग असून ही उच्चभ्रू लोकांची वस्ती म्हणून ओळखली जाते. येथे वॉचमनचा दिवस रात्र पहारा असतो. चड्डी बनियन घालून आलेल्या दरोडेखोरांनी रात्री पहाऱ्यावर असणाऱ्या वॉचमनचे हातपाय बांधून, जी घरे बंद आहेत अशा घराची कुलपे तोडून हा दरोडा घातला आहे. यात त्यांना बी वींग मधील एका घरात काही न मिळाल्याने त्यांनी दुसऱ्या वींग कडे आपला मोर्चा वळवला आणि तळमजल्यावर राहणाऱ्या अंजना गुप्ता यांच्या घरात घुसून आपला हेतू साध्य केला. पोलीसांनी श्वानपथकाला पाचारण करून व तज्ज्ञांनी ठसे घेवून घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी तपासासाठी पथके रवाना केली आहेत. वसई पूर्व सेक्टर ८ मधील ट्रिनिटी गार्डन, व्हिजन हाइट, इंदपुरम या तीन इमारतींच्या वॉचमनचे हात पाय बांधून ३ फ्लॅटमध्ये चड्डी बनियान गॅँगने १५ दिवसांपूर्वी दरोडा टाकला होता. ही घटना ताजी असतानाच याच गँगने मंगळवारी विरार येथील यशवंत नगर येथेही अशाच एका घटनेची पुनरावृत्ती केली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास या दरोडेखोरांनी तोंडाला मास्क लावून व चड्डी बनियान घालून दरोडा घातला होता. (वार्ताहर)
चड्डी बनियान गँगचा विरारमध्ये दरोडा
By admin | Published: August 05, 2015 1:00 AM