जव्हार : तालुक्यात प्रधान मंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत खंडीपाडा ते माळघर, दापटी, वांगणी, या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापासून प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ठेकेदाराकडून केले जात आहे. मात्र त्यांनी केलेल्या दिरंगाईमुळे या परिसरातील रस्त्यावर चिखलच चिखल साचला आहे. त्यामुळे येथील एसटीची बससेवा बंद झाली आहे. या परिसरातून अनेक विद्यार्थी जव्हार, विनवळ, जामसर येथील शाळा व महाविद्यालयात जातात. मात्र दापटी येथे मुक्कामी येणारी बससेवा बंद असल्याने नागरीक व विद्यार्थींचे मोठे हाल होत आहेत.जव्हार तालुक्यात खंडीपाडा ते माळघर, दापटी, वांगणी या रस्त्याचे २१ कि.मी. अंतरावरचे रस्त्याचे काम प्रधान मंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सन-२०१४ पासून चालू आहे. हे काम एस. ए. जाधव पुणे, येथील ठेकेदाराला देण्यात आले. भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे या रस्त्यासाठी अंदाजित रक्कम ७३३.५९ लक्ष रुपये देण्यात आले आहे.मात्र, या ठेकेदाराने या रस्त्यावर उन्हाळयात माती पसरवून ठेवली व खडी, टाकलीच नाही. या प्रकारामुळे या सर्व रस्त्यावर चिखलच चिखल झाला आहे. या परिस्थितीमुळे दापटी येथे येणारी एसटीची बससेवा खंडीत करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सकाळची बस गाठण्यासाठी ३ कि.मी. अंतरावर खंडीपाडा येथे जावे लागत आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे खंडीपाडा ते माळघर वांगणी या रस्त्याचे काम उन्हाळयात न झाल्याने भर पावसात नागरिकांचे हाल सुरु झाले आहे. या रस्त्यावर वांगणी, वावर, येथे इयत्ता- १० वी पर्यंतच्या दोन शाळा असून, प्रत्येक गाव पाडयात जिल्हा परिषद शाळा आहेत. रस्ता बंद असल्याने या शाळेत रोज येणाऱ्या शिक्षकांना वड येथून फेरा मारून शाळेवर जावे लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम आणि एसटी अधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिलेला आहे. (वार्ताहर)
अर्धवट रस्त्यामुळे ४ गावांची एसटी बंद
By admin | Published: July 12, 2016 2:18 AM