प्रज्ञा म्हात्रे ।ठाणे : जीएसटीमुळे राख्यांचेही दर वाढतील या भीतीने यंदाच्या रक्षाबंधनासाठी पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात राख्या ठाण्याच्या बाजारात आल्या आहेत. कासव, स्पीनर, व्हॉटस अॅप अशा राख्यांनी यंदा वेगळेपण ंआणले असले तरी त्यापेक्षा फार वेगळी व्हरायटी यंदा पाहायला मिळत नाही. जीएसटीमुळे असेल पण यंदा दरात वाढही झालेली नाही आणि घटही झालेली नाही, असे दुकानमालकांनी सांगितले.रक्षाबंधनाचा सण आठवडाभरात येऊन ठेपला. त्यानिमित्त गेल्या आठवडाभरात नानारंगी राख्या बाजारात आल्या असल्या तरी या राख्यांमध्ये दरवर्षी दिसून येणारे नाविन्यपूर्ण प्रकार यंदा मोजकेच असल्याचे ठाणेकरांचे म्हणणे आहे. त्यांच्या या मताला दुकान मालकांनीही दुजोरा दिला आहे. जीएसटीच्या भीतीने यंदा जास्त राख्या विक्रीसाठी आणल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.परदेशात राख्या पाठवाव्या लागत असल्यामुळे महिनाभर आधीच राख्यांची खरेदी दुकानमालक करीत असतात. राख्यांवरही जीएसटी लागू होते की काय आणि किती याबाबत आम्ही गोंधळलो होतो म्हणून यंदा २० ते ३० टक्केच माल आणला आणि त्यातही फारसे नवे प्रकार नसल्याचे दुकान मालक सुशील गाला यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राख्यांवर जीएसटी नसल्याचे नंतर समजले. परंतु आता नवीन राख्या आणणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यंदा राख्यांचे दर वाढलेले नाहीत आणि कमीही झाले नाही असे विक्रेत्यांनी सांगितले. मोठ्यांसाठी कासवाची राखी, बच्चे कंपनीसाठी स्पीनर राखी आणि तरुणाईला आकर्षित करणारी व्हॉट्सअॅप राखी या नव्याने पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राख्यांमध्ये मीनाकारी, वुडनमध्ये कार्व्हिंग राखी- त्यात ओम, गणपती, जरदोसी, मोती, रुद्राक्ष, इव्हील आय, डायमण्ड, गोल्ड प्लेटेड अमेरिकन डायमण्डची राखी, सिल्व्हर प्लेटेड, गोल्ड प्लेटेड विथ चंदन, डायमण्डमध्ये ओमची राखी, ब्रेस्लेटमध्ये ओम, रुद्राक्ष राखी, क्रिस्टल रुद्राक्ष राखी या प्रकारांच्या राख्या बाजारात आल्या असून याची किंमत १० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत आहे.
कासव, स्पीनर, व्हॉट्सअॅपच्या राख्या बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:31 AM