नालासोपारा : पूर्वेकडील सेंट्रल पार्क येथील गोल्ड लोन देणा-या युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेडच्या शाखेमध्ये शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या आसपास ६ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत अंदाजे अडीच कोटी रुपयांचे सोने लुटून नेले. दिवसाढवळ्या अवघ्या १२ मिनिटांतच ६ दरोडेखोरांनी करोडोंचे सोने लुटून नेले आहे.नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्कमधील मुख्य रस्त्यावर असलेल्या आयरिश सोसायटीच्या दुकान नंबर १ मध्ये युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेड या गोल्ड लोन देणाºया शाखेचे कार्यालय आहे. शुक्रवारी सकाळी एका गाडीतून सहा जण उतरले आणि त्यांनी तोंडाला मास्क लावून, हातात हत्यारे घेऊन कार्यालयात प्रवेश केला. या वेळी कामावर आलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांना दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून अंदाजे दोन ते अडीच कोटींचे सोने अवघ्या १२ मिनिटांमध्ये लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली. दरोडेखोरांनी विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या पूर्वेकडील मोहक सिटीच्या परिसरात दरोड्यासाठी आणलेली गाडी सोडून पळ काढला.या शाखेमध्ये अनेक ज्वेलर्स मालकांनी सोने ठेवून कर्ज घेतल्याचेही सांगितले जाते. किती तोळे सोने या दरोडेखोरांनी नेले आहे याचा अद्याप उलगडा झाला नसून शाखेतील अधिकारी, कर्मचारी, तुळिंज पोलीस याचा तपास करत आहेत. दरोड्याच्या ठिकाणी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस उपअधीक्षक प्रशांत परदेशी यांच्यासह तालुक्यातील पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता. हा दरोडा टाकणारे दरोडेखोर हे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल करून कोणाला काही कळले तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
12 मिनिटांत लुटले अडीच कोटींचे सोने; नालासोपाऱ्यात सशस्त्र दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 6:52 AM