वसई : बंदी असतानाही सक्शन पंपाद्वारे बेकादा रेती उत्खनन करणाऱ्या वैतरणा आणि कशिद कोपर येथील रेती बंदरांवर तहसिलदाराच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत पथकाने वीस सक्शन पंपांसह आठ बोटी जाळून नष्ट केल.वैतरणा आणि कशिद कोपर परिसरात सक्शन पंपाने बेकायदा रेती उत्खनन होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांनी याठिकाणी अचानक धाड घातली. त्यात वीस सक्शन पंप असलेल्या आठ बोटी हाती लागल्या. पथकाने गॅस कटरच्या साहय्याने पंप नष्ट केले. तसेच आठही बोटी जाळून नष्ट केल्या. यावेळी ११२ ब्रास रेतीचा बेकादा साठा जप्त करण्यात आला. तसेच बेकादा रेती वाहतूक करणाऱ्या चार ट्रकवर कारवाई करुन त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. वैतरणा रेल्वे पूलानजिक सक्शन पंपाव्दारे बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्या काही बोटी गेल्या आठवड्यातच जाळण्यात आल्या होत्या. त्यानंतर काल तहसिलदारांनी धाड घातली. वैतरणा खाडीतून काढली जाणारी चोरटी रेती संध्याकाळनंतर कणेर फाट्यामार्गे मुंबईकडे रवाना केली जाते. संध्याकाळी कणेर पोलीस चौकीनजिक शेकडो मोटार सायकली आणि अनेक गाड्या उभ्या असतात. पहाटेपर्यंत मोटार सायकली आणि कारच्या बंदोबस्तात रेतीने भरलेले ट्रक मुंबईत सहीसलामत पोहचवण्याचे काम होत असल्याचे उघडपणे पहायला मिळते. सूर्यास्तापूर्वी आणि नंतर रेती उत्खनन आणि वाहतूकीला कायद्याने बंदी आहे. पण, ही बंदी धाब्यावर बसवून एकाच परवान्यावर अनेक ट्रक रेतीची चोरटी वाहतूक केली जाते. त्यावर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. (प्रतिनिधी)
वीस सक्शन पंप, ८ बोटी जाळून नष्ट
By admin | Published: June 21, 2016 12:56 AM