नालासोपारा (मंगेश कराळे) :-विरारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुरुवारी दुपारी २० लाख रुपयांच्या मॅफेड्रॉन अंमली पदार्थासह दोन आरोपींना अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शुक्रवारी दिली आहे.
मनवेल पाड्यातील मोहक सिटी जवळ गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास दोन आरोपी मॅफेड्रॉन अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती विरार गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाली होती. मिळालेली बातमी वरिष्ठांना कळवुन त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचना व आदेशान्वये सदर ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी तिथे दुचाकीवरून आलेले आरोपी मोहमद इशाक शेख (३४) आणि मोहमद मोईनुद्दीन शेख (२५) या दोन्ही आरोपींना शिताफिने ताब्यात घेतले. आरोपींची अंगझडती घेतल्यावर त्यांच्या कब्जात १९ लाख ४० हजार रुपये किंमतीचा ९७ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन अंमली पदार्थ, वजनकाटा, एक बुलेट दुचाकी असा २० लाख ९० हजार ६३० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त केला आहे. विरार पोलिसांनी एनडीपीएस प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजित मडके व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, विशाल लोहार, संदिप शेरमाळे, योगेश नागरे, संदिप शेळके, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, प्रफुल सोनार यांनी केली आहे.