लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- रिचर्ड कंपाऊंड येथील मनीचापाडा या परिसरात एक पिस्टल, एक जीवंत काडतुसासह दोन आरोपींना पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी पकडले आहे. पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल करून २५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.
पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमला गुप्त माहिती मिळाली की, रिचर्ड कंपाऊंडच्या मनिचापाडा येथील आर्म स्ट्राँग इंडीया कन्ट्रक्शन आरएमसी प्लँन्ट कंपनीच्या समोर दोघे कब्जात विनापरवाना बेकायदेशिररित्या अग्निशस्त्र घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी सापळा लावून कारवाई करत आरोपी मोईन अन्वर शेख आणि शकील अहमद इसरार खान या दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतल्यावर एक ऍटोमॅटिक पिस्टल आणि एक जीवंत काडतुस सापडले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेंद्र शेलार व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, गोरखनाथ खोत, प्रताप पाचुंदे, संदिप शेळके, सचिन बळीद, रोशन पुरकर, किरण आव्हाड, बालाजी गायकवाड, निखिल मंडलिक यांनी केली आहे.
दोन आरोपींना पिस्टल व १ जिवंत काडतुसासह पकडले आहे. गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना शुक्रवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - वसंत लब्दे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)