- शशी करपे, वसईनालासोपारा शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा खुलेआम प्रवासी वाहतूक करीत असल्याने टॅ्रफिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. तुळींज पोलिसांनी बोगस रिक्षाचालकाला अटक करून रिक्षा जप्त केली आहे. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांची बेकायदा रिक्षा चालकांना अभय देऊन खाजगी सहाय्यकांमार्फत होणारी हप्ता वसुली चव्हाट्यावर आली आहे. विरार आणि नालासोपारा शहरात एकाच नंबरच्या अनेक रिक्षा असल्याच्या अनेक तक्रारी असताना त्याकडे काणाडोळा केला जात अहे. शेवटी नालासोपारा शहरात एकच नंबर असलेल्या दोन रिक्षा प्रवासी वाहतूक करताना पकडण्यात आल्या आहेत. तुळींज पोलिसांना एकाच नंबरच्या काही रिक्षा प्रवाशी वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी रिक्षांची तपासणी सुरु केली होती. त्यात एमएच ४८-२०७१ या क्रमांकाच्या दोन रिक्षा एकाच स्टँडवर प्रवासी वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली, त्यावेळी मुकेश यादव नावाचा चालक बोगस रिक्षा चालवत असल्याचे उजेडात आले. नल्ला रिक्षांचा सुळसुळाट; मॅजिक रिक्षा खुलेआमधक्कादायक बाब म्हणजे एकट्या वसई गावात आरटीओने कागदोपत्री भंगारात काढलेल्या ४० हून अधिक रिक्षा प्रवाशी वाहतूक करीत आहेत. मात्र, बेकायदा रिक्षा वाहतूकीतून महिन्याला लाखो रुपयांची कमाई असल्याने ट्रॅफिक पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप काही रिक्षा संघटनांनी केला होता.वसई विरार परिसरात अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट झाला आहे. त्याचबरोबर लायसन्स, बॅज नसतांनाही अनेक जण रिक्षा चालवत आहेत. नालासोपारा आणि विरार शहरात प्रवासी वाहून नेण्याची परवानगी नसताना दोनशेहून अधिक मॅजिक रिक्षा प्रवासी वाहतूक करीत आहे. वसई पूर्वे ते वसई हायवे दरम्यान अ़नेक खाजगी बसेस परवानगी नसताना टप्पा वाहतूक करीत आहेत. मात्र, ट्रॅफिक पोलीस त्यांच्यावर कोणतीच कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सोपाऱ्यात एकाच नंबरच्या दोन रिक्षा
By admin | Published: March 09, 2017 2:09 AM