हितेन नाईक / पालघरपालघर नगरपरिषदे च्या २०१३-१४ च्या आर्थिक वर्षातील प्रभाग क्र .२५ मधील दोन रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामाची दोन वेळा बिले काढून ४ लाख ६४ हजार ५५५ हजार रु पयांची नगरपरिषदेची लूट करण्यात आली आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. या लुटीच्या प्रकारात ठेकेदारासोबत शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा हात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. उद्धवा अजब तुझे सरकार, असे रडगाणे गाण्याची पाळी पालघरवासियांवर आली आहे.नगरपरिषदेने प्रभाग क्र.२४ मध्ये सार्वजनिक बोअरिंग ते प्रल्हाद भुकटे तर मोहपाड्यातील शिंदे यांच्या घरापासून शंकर डोंगरेकर अशा दोन घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. ठेकेदार मे. ए.बी.व्ही गोविंदू यांच्या नावाची अनुक्रमे १ लाख ७४ हजार ३६७ रुपये आणि ३ लाख ७८ हजार ६२७ रु पये अशी एकूण ५ लाख ५२ हजार ९९४ रु पये खर्चाच्या निविदा मंजूर करण्यात येऊन ४५ दिवसात काम पूर्ण करण्याची मर्यादा घालण्यात आली होती. आणि या दोन्ही कामांची पूर्तता केल्याने आपल्याला दोन्ही रस्त्याच्या कामांच्या बिलांची रक्कम देण्याची मागणी ठेकेदार गोविंदू यांनी तत्कालीन मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याकडे केली.नगरपरिषदेत कार्यरत असलेले अभियंता मिश्रा यांनी रस्त्यांची मोजमापे घेऊन तर अन्य क्लार्क, लेखापाल यांनीही बिले मंजूर करण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय नोंदविल्या नंतर तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी दोन्ही रस्त्यांच्या कामाची ४ लाख ६४ हजार ४९९ रुपयांच्या धनादेशाची रक्कम ठेकेदार गोविंदू यांनी २६ मार्च २०१४ रोजी नगरपरिषदेच्या बँक खात्यातून वटवूनिह घेतली. परंतु आर्थिक वर्ष बदलल्याने मुख्याधिकारी आवारे यांनी सार्वजनिक निधीचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करण्याच्या हेतूने ठेकेदार गोविंदू, अभियंते मिश्रा आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पुन्हा त्याच कामाची बिले अदा करण्याचे बाकी राहील्याचे दाखविले. पुन्हा ४ लाख ६४ हजार ४९९ हजार रुपयांचा धनादेश बनवून ठेकेदार गोविंदू यांनी १० एप्रिल २०१४ रोजी वरील रक्कम नगरपरिषदेच्या बँक खात्यातून काढूनही घेतली. या लुटीची चर्चा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत झाली मात्र या लुटीच्या कारस्थानात सहभागी झालेल्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई होतांना दिसत नसल्याने शिवसेनेचे नगरसेवक कैलास म्हात्रे यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्षाकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या कडे मागणी करूनही कारवाई केली जात नसल्याने त्यांनी आता पोलीस ठाण्यात फसणुकीचा गुन्हा संबंधितांविरुद्ध दाखल केला जाणार आहे.गेली दोन दशके या पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. आताही जनतेने तिला बहुमत दिले आहे असे असतांनाही तिच्या पैशाची अशी लूट सुरू आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख धृतराष्ट्र झाले आहे. जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे देखील गांधारी झाले आहेत.
एकाच कामाची दोन बिले
By admin | Published: March 30, 2017 5:29 AM