मंगेश कराळे - नालासोपारा - घरफोडी करणाऱ्या आरोपी महिलेसह तिच्या मित्राला अटक करण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. या गुन्ह्यात चोरी झालेला १०० टक्के माल हस्तगत केल्याची माहिती नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल यांनी लोकमतला बुधवारी सांगितले.
राहुल इंटरनॅशनल शाळेच्या बाजूला असलेल्या जय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या यशस्वी मुडकर (३५) यांच्या घरी २४ जुलैला सकाळी घरफोडी झाली होती. चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातून ४ लाख २१ हजार ६४० रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी २५ जुलैला घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडी चोरीचे प्रमाण वाढल्याने वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास सुरु केला. घटना स्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच बातमीदाराच्या माहितीनुसार तपास करण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीएक माहीती हाती लागली नाही. त्यामुळे बिल्डींगच्याच व्यक्तीने चोरी केली असल्याचा दाट संशय निर्माण झाला. त्याप्रमाणे यशस्वी यांचेकडे वारंवार चौकशी करुन बिल्डींगमधील संशयीत व्यक्तीकडे चौकशी करण्यास सुरुवात केली.
या तपासात यशस्वी यांचे शेजारी राहणारी आरोपी महीला निधी भावेश माळी (२७) हिच्याकडे पोलीस तपासाचे सर्व मार्गाचा अवलंब करुन बुध्दी चातुर्याने कौशल्यपूर्ण तपास केला असता, तीने सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली. तसेच गुन्ह्यातील काही दागिने तीचा मित्र प्रविण रोकडे (३९) याच्याकडे देऊन ते दागिने मुथ्युट फायनान्स कंपनीत ठेवून त्यावर पैसे उचलल्याचे दिसून आले. आरोपी महिला निधी माळी व प्रवीण रोकडे या दोघांना १५ ऑगस्टला संध्याकाळी अटक केले. आरोपींकडून ८६.९८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण, लहान मुलीचे कमरेची चेन व रोख रक्कम असा ४ लाख ७६ हजार ३३४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त जयंत भजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र लगारे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल, सपोनि राजेंद्र चंदनकर, पो.उपनिरी/योगेश मोरे, सफौज. हिरालाल निकुंभ, पोहवा किशोर धनु, प्रशांत साळुंके, अमोल लटकरे, कल्याण बाचकर, राजेश नाटूलकर, प्रेम घोडेराव, बाबासाहेब बनसोडे, प्रताप शिंदे यांनी केलेली आहे.