मीरारोड - मीरारोड भागातील एका घरफोडी प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी आई सह तिच्या दोन घरफोड्या मुलांना अटक केली आहे. त्यांच्या कडून चोरीचा ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी पत्रकारांना दिली. मीरारोडच्या प्लेझंट पार्क मध्ये राहणारे वैभव गोपाळ आव्हाड हे ८ डिसेम्बरच्या सायंकाळी कुटुंबियां सोबत गोराई बीच येथे फिरण्यासाठी गेले होते . रात्री पावणे आठ वाजता सर्व घरी आले असता दाराचा कडीकोयंडा तोडलेला तसेच बेडरूम मधील तिजोरीचे लॉक तोडून आतील सोन्या - चांदीचे दागिने आदी ८ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता . घरफोडी प्रकरणी आव्हाड यांच्या फिर्यादी वरून काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
उपायुक्त जयंत बजबळे व सहायक आयुक्त महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप कदम, पोलीस निरीक्षक समीर शेख, सहायक निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक शिवाजी खाडे सह अनिल पवार, दिपक वारे, प्रताप पाचुंदे, राहुल सोनकांबळे, निलेश शिंदे, निकम, रवी कांबळे, प्रविण टोबरे, किरण विरकर, राजेंद्र सुर्यवंशी यांनी घरफोडीचा तपास विविध प्रकारे सुरु केला. गुन्ह्याच्या घटनास्थळी व आजुबाजुचे सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज तपासले असता त्यामध्ये एक संशईत इसम हा घटनास्थळावर येताना व जाताना दिसुन आला. पोलीस ठाणे अभिलेखावरील घरफोडी व चोरी करणारे आरोपी यांचे फोटो तपासले असता त्यामध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी शमीम मोहम्मद हारुन शहा (२३ ) रा . मुन्शी कंपाउंड, काशीमीरा हा फुटेज मधील संशियत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता गुन्हात त्याचा भाऊ सलीम मोहम्मद हारुन शहा (२५ ) व त्याची आई सैदुनिसा मोहम्मद हारुण शहा ( ५० ) ह्यांचा सुद्धा सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना १५ डिसेम्बर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. शमीम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर काशीमीरा पोलीस ठाण्यात चोरीचे ३ गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक निरीक्षक योगेश काळे करत आहेत.