नालासोपारा : धानिवबाग येथील हरवटेपाडा विभागात जमिनीच्या वादातील पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये बुधवारी रात्री तुफान हाणामारी व दगडफेकीची घटना घडली. यात दोन्ही गटातील ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, ९ दुचाकींची तोडफोड करून एक दुचाकी जाळण्यात आली आहे. या प्रकरणी वालीव पोलिसांनी संजय बिहारी याला अटक केली आहे.नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग परिसरात बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हरवटेपाडा येथील बिहारी चाळीत राहणारा शिवसेनेचा पदाधिकारी संजय महतो याच्या शिवसेना कार्यालयाबाहेरील रस्त्यावर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे अमित जोशी, राकेश यादव, बिकेश यादव, किरण जोशी व इतर १० ते १२ जणांनी तोडले. तसेच संजय महातो आणि त्याचा सहकारी प्रमोद यादव यांच्यावर धारदार शस्त्र, तलवारी, लाठ्या, लाकडी दांडके, दगड याच्या साहाय्याने प्राणघातक हल्ला केला.यात एकूण ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर संजय आणि प्रमोद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. प्रमोदच्या डोक्याला १८ टाके पडले असून त्याला उपचारासाठी धानिवबाग येथील साई हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या प्रकरणी वालीव पोलिसांनी व दोन्ही गटातील आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले. अन्य आरोपींचा शोध सुरू असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.पूर्ववैमनस्यातून घडली घटनादोन्ही गटांमध्ये जमिनीच्या वादातून पूर्ववैमनस्यातून तुफान हाणामारी झाली आहे. ९ दुचाकी फोडल्या असून एक दुचाकी जाळली आहे. दोन्ही गटांतील आरोपींविरोधात जीवे ठार मारण्याचे गुन्हे दाखल केले असून आरोपी संजय बिहारीला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहोत.- विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे
जमिनीच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 4:21 AM