नालासोपारा : वसई पूर्वेकडील आणि नालासोपारा फाटा येथील दोन वेगवेगळ्या कंपन्यांत शनिवारी आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी एका कंपनीतील आग विझवली आहे, तर दुसऱ्या कंपनीतील आग विझवण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.वसई पूर्वेकडील गावराई पाड्याच्या औद्योगिक वसाहतीमध्ये कोटिंग करणाऱ्या कंपनीत शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागली. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र कंपनी पूर्ण जळून खाक झाली आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग पूर्णपणे विझवली आहे. या ठिकाणी गॅस सिलिंडर होते. पण प्रसंगावधान राखून अग्निशमन दलाच्या जवानांनी ७ सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.दुसऱ्या घटनेत नालासोपारा पूर्वेकडील पेल्हारफाटा येथील जाबर पाड्यातील कंसारा कम्पाउंडमधील थर्माकोल आणि प्लास्टिक प्रिंटिंग कंपनीला शनिवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान करीत आहेत.
सुरक्षिततेची नियमावली पायदळी नालासोपारा पेल्हार विभागात अनेक अनधिकृत कंपन्यांचे गाळे असून कोणत्याही सुरक्षिततेची नियमावली पायदळी तुडवून कंपन्या सुरू आहे. त्याकडे औद्योगिक सुरक्षा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. ही आग नेमकी कशाने लागली हे समजू शकले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तीन वॉटर टँकरच्या सहाय्याने अथक परिश्रम करीत आहेत.