नालासोपारा : बहुजन महापार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तसलीमुन्नीसा खान आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी घेतल्याची तक्रार तुळींज पोलिसांत दाखल झाली आहे. बहुजन विकास आघाडी (बविआ)च्या नेत्यांनी सभापती अब्दूल सुलेमान हक यांना ही सुपारी दिल्याचे खान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.सभापती अब्दुल सुलेमान हक यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे खान यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, हक यांनी फोनवरून सुपारी घेतल्याची खबर खान यांना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मिळाली.अब्दुल हक आणि सुपारी देणाऱ्या व्यक्तीमध्ये १० मे रोजी रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान बोलणे झाले असून, त्या दिवसाचे कॉल रेकॉर्डिंग तपासण्याची त्यांनी मागणी केली आहे. हे संभाषण वसईफाटा पेट्रोलपंपाच्या परिसरात झाले असल्याचेही तक्र ारीत नमूद केले आहे.निवडणूक चिन्ह गोठविल्याचा राग?यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे शिट्टी हे चिन्ह बहुजन महापार्टीमुळे निवडणूक आयोगाने गोठवल्याचा राग बविआला होता. त्याचा बदला घेण्यासाठी बहुजन विकास आघाडीतील माणसांनी आपल्याला जीवे ठार मारण्याचा कट रचला आहे. भविष्यात आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना कोणताही अपाय झाल्यास किंवा कोणताही अपघात घडल्यास त्यास बहुजन विकास आघाडीला आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पक्षाध्यक्षाला मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी?, बविआच्या सभापतीवर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 4:15 AM