डहाणू : गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या सयाजी एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास दोन दिवसांचे अर्भक रडत असताना आढळले. त्याच्या पालकांचा शोध घेतला असता, कोणीही न आल्याने काही प्रवाशांच्या मदतीने डहाणू रेल्वे पोलिसांच्या ताब्यात या अर्भकाला देण्यात आले आहे. दरम्यान, या बाळाच्या माता-पित्यांचा शोध सुरू आहे.
या बालकाला डहाणू उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून, डहाणू आरपीएफ तसेच जीआरपी पोलिसांनी वापी रेल्वे पोलिसांशी संपर्क करून त्यांच्याकडे हे बालक सुपूर्द करणार असल्याची माहिती पालघर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी वसंत रॉय यांनी दिली.
भरूचहून मुंबईकडे जाणाऱ्या सयाजी एक्स्प्रेसमध्ये बालकाच्या रडण्याचा आवाज प्रवाशांच्या कानावर पडला असता, लहान मूल रडत असल्याचे समजून प्रवाशांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, वापी येथे बाळाच्या रडण्याचा आवाज वाढू लागल्याने प्रवाशांनी आवाजाचा शोध घेतला असता, सीटच्या खाली दोन दिवसांचे बाळ दिसून आले. त्याच्या पालकांचा शोध घेतला असता, कोणीही पुढे आले नाही. दरम्यान, वापीहून ट्रेन सुरू झाल्याने प्रवाशांनी पुढील डहाणू रेल्वे पोलिसांना कळवून डहाणू येथे आरपीएफच्या ताब्यात बाळ दिले.