बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र परिसरात शनिवारी सकाळी एकाच वेळी १५ ते २० कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या कुत्र्यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र या कुत्र्यांची गुपचूप विल्हेवाट लावण्यात आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनास्थळी शनिवारी सकाळी सुमारे १५ ते २० कुत्रे भटकत होते. त्यातील काही कुत्रे अचानकपणे निपचित पडून त्यांचा काही वेळेतच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील काही भागात उघड्यावरच प्रदूषित पाणी सोडले जात असल्याचे निदर्शनास येत असून उन्हाच्या उकाड्याने हे कुत्रे पाण्यात खेळत असताना प्रदूषित पाण्याच्या परिणामाने किंवा पाणी प्याल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे का? हे चौकशी व मृत्यूचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या या कुत्र्यांना पुरण्यात आले असून ते मृतदेह उकरून काढण्यात येणार आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात २० कुत्र्यांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 12:40 AM