पालघर : आठवडा भरापासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रविवारी पहाटे गोठणपूर गावामध्ये एक घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले तर अन्य दोन घरांवर झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी घरांचे मोठे नुकसान झाले असून एक ७० वर्षीय महिला जखमी झाली आहे.
पावसाने काही दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा जोरदार तडाखा द्यायला सुरु वात केली असून नदी-नाले, रस्ते भरून वाहू लागले होते. गोठणपुर येथील रहिवासी असलेले सुभाष सखाराम रिंजड हे शनिवारी आपल्या परिवारासह गौरी विसर्जनासाठी आपल्या नातेवाईकाकडे गेले होते. विसर्जन करून घरी परतल्यावर सोसाट्याच्या वाºयासह आलेल्या पावसामुळे त्यांचे घर पूर्णत: कोसळून उध्वस्त झाले. ह्याच वेळी घरातले सर्व सदस्य बाहेर असल्या कारणाने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील मालमत्तेसह घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. याच दरम्यान रुपाली सखाराम रिंजड, रामदास गणपत रिंजड यांच्याही घरावर झाड कोसळल्याने रुपाली रिंजड या जखमी झाल्या.
ह्या घटनेची माहिती कळताच पालघर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने झाड हटवण्यासाठी मदत केली. या सर्व घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरीही घराचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यावेळी प्रशासनाने भरपाई देण्याची मागणी नुकसान झालेल्या कुटुंबीयांनी केली आहे. आता महसुल यंत्रणा या नुकसानीचे पंचनामे कधी व कसे करते यावरच सारे अवलंबुन असणार आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ नगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन विभागाकडे खबर दिली. मात्र अग्निशमन विभागाच्या कर्मचाºयांकडून झाड कापण्यासाठी लागणारे यंत्र खराब झाल्याचे सांगून मिल मधून आम्ही घेऊन येतो थोडा उशीर लागेल असे त्यांनी सांगितले. जर नगरपालिका अत्यावश्यक सेवा कडे दुर्लक्ष करत असेल तर शहराचे काय होईल ? - दिनेश बाबर , नगरसेवक