लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर एमआयडीसीतील एका टेक्सटाइल कंपनीत शनिवारी पहाटे भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन कामगार जागीच ठार झाले, तर पाच जण जखमी झाले आहेत. एक कामगार गंभीर असून, त्याला वसई येथील रुग्णालयात दाखल केले आहे. उर्वरित कामगारांवर बोईसर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्लॉट नंबर जे १/१ मधील जकारिया इंडस्ट्रीज या कपड्यावर प्रोसेस करणाऱ्या टेक्स्टाइल कारखान्यातील थर्मोपॅक विभागात पहाटे ५.४०च्या दरम्यान झालेल्या भीषण स्फोटाचा आवाज पाच किमीपर्यंत आला. या स्फोटामुळे कारखान्यात काचा व पत्र्याचा खच पडून थर्मोपॅक विभागातील मशिनरीचा चक्काचूर झाला असून, तारापूर अग्निशमन दलाने दोन तासांत आग नियंत्रणात आणली, तरीही दुपारपर्यंत आग धुमसत होती. आगीत मिथिलेश राजवंशी (३८) हा कामगार पूर्णपणे जळून त्याच्या शरीराचा कोळसा झाला होता, तर छोटेलाल सरोज (३७) याचा मृतदेह साडेचारच्या दरम्यान मिळाला. सरोज याचा मृतदेह मिळत नव्हता, म्हणून या दोघा कामगारांपैकी निश्चित कोणाचा मृत्यू झाला आणि कोण बेपत्ता आहे, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यामुळे बेपत्ता कामगाराची शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू होती, तर या गोंधळाच्या परिस्थितीमुळे कामगारांचे नातेवाईक प्रचंड चिंताग्रस्त स्थितीत कारखान्याच्या प्रवेशद्वारावर जमा झाले होते.
थर्मिक फ्युइड हिटरमध्ये ऑइल गरम करून ते ऑइल प्लांटमधील टेक्स्टाइल मशीनवर फिरविले जात असताना, या थर्मिक फ्युइड हिटरमधील क्वाइलचा भीषण स्फोट होऊन त्यामधील उकळते ऑइल सर्वत्र बाहेर फेकले गेले आणि आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून, घटनेच्या निश्चित कारणांचा शोध सदर अधिकारी घेत आहेत. घटनास्थळी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, शिवसेनेचे पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संखे, माजी सभापती मनीषा पिंपळे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी घटनास्थळी येऊन पाहणी करून, त्यांनी जखमी कामगारांची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली.