जव्हार : जव्हार तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये आणि दाेन ग्रामदान मंडळांत असे एकूण ५० संगणक परिचालक तालुक्यात कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र अर्थात ‘संग्राम’ व आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायती, तालुकास्तरावर पंचायत समित्या व जिल्हास्तरावर, जिल्हा परिषद स्तरांवर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ऑक्टाेबर आणि नाेव्हेंबर या दाेन महिन्यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही.डिसेंबरचा पंधरवडा उलटला तरी सप्टेंबरपर्यंतचेच मानधन जव्हार तालुक्यातील संगणक परिचालकांना अदा केलेले आहे. डिजिटल महाराष्ट्राचे काम करणारे संगणक परिचालक ग्रामीण भागातील जनतेला रहिवासी, बांधकाम परवाना, पीटीआर नक्कल असे सर्व २९ प्रकारचे दाखले, ग्रामपंचायतीतील सर्व जमा-खर्चाची नोंद ठेवणे, सभेचे ऑनलाइन कामकाज, १४ व्या वित्त आयोगाचा गावविकास आराखडा याबरोबरच ग्रामपंचायत स्तरावर असलेली कामे करीत आहेत.
मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीशेतकरी कर्जमाफी, अस्मिता योजना, जनगणना, घरकुल सर्व्हे, प्रधानमंत्री पीकविमा योजना इ. प्रकारची महत्त्वपूर्ण कामे करणाऱ्या संगणक परिचालकांच्या मागण्या अद्याप दुर्लक्षित आहेत. डिजिटल महाराष्ट्राचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांकडून काम करून घेण्यात येत असताना त्यांना वेळेत मानधन देण्यात येत नाही. शासनाने याबाबत चार करून संगणक परिचालकपद निश्चित करून महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती देण्यात यावी, असे जव्हार तालुक्यातील संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष युवराज चाैधरी यांनी सांगितले.