वाडा : तालुक्यातील घोडविंदे पाडा ते भिवंडी - वाडा महामार्ग या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम मे महिन्यात करण्यात आले होते. मात्र, दोन महिन्यात या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून ग्रामस्थांनी या रस्त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार, कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
वाडा तालुक्यातील घोडविंदे पाडा ते भिवंडी - वाडा महामार्ग या ७०० मीटर अंतराच्या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ५०/५४ या योजनेतून मंजूर झाले असून त्यासाठी दहा लाख रूपयांचा निधी मंजूर आहे. रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम मे महिन्यात करण्यात आले. असे असताना दोन महिन्यात हा रस्ता खड्ड्यात गेला आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता पूर्णपणे उखडला गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे.
दरम्यान, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि शाखा अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाईची ग्रामस्थांची मागणी आहे. या निवेदनाच्या प्रती सा.बां. विभागाचे सहा. अभियंता, पोलीस प्रशासन, मुसारणे ग्रा.पं. यांना देण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
घोडविंदे पाडा रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाल्याने दोनच महिन्यात हा रस्ता पूर्णपणे उखडला असून त्याची दुरवस्था झाली आहे. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत केवळ दोन वेळा या रस्त्याचे काम केले आहे. तेही असे झाल्याने ग्रामस्थांत प्रचंड संताप आहे. -हरेश घोडविंदे ग्रामस्थ, घोडविंदे पाडासंबंधित ठेकेदाराला या कामाचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. रस्त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल.- प्रकाश पातकर, शाखा अभियंता