वसई - वसई गावातील तामतलाव येथे रविवारी रात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत शेट्टी जनरल स्टोर्सच्या मालकाची दोन्ही दुकाने पूर्णपणे भस्मसात झाली आहेत. या भीषण लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या आगीत दोन्ही जनरल दुकानातील विविध साहित्य जळून खाक झाल्याने शेट्टी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी रात्री 11.30 नंतर तामतलाव येथील या दोन्ही दुकानातून धूर येत असल्याचे लक्षात आल्यावर बघता बघता इथे दुकानांनी मोठा पेट घेतला होता.
त्यावेळी तात्काळ नागरिकांनी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दल व वसई पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. या प्रसंगी नागरिका सहित वसई प्रभागाचे सभापती प्रवीण शेट्टी जातीने उपस्थित होते. दरम्यान या आगीचे रौद्ररूप पाहता तातडीनं नवघर माणिकपूर येथून एक बंब तर वसई विभागातुन दोन अतिरिक्त बंब असे तीन बंब घटनास्थळी बोलवण्यात आले होते.
तर आगीचे स्वरूप मोठया प्रमाणावर असल्याने काही तास या भागातील वीज ही खंडीत करण्यात आली होती,अग्निशमन दलाने या आगीवर बऱ्याच वेळाने नियंत्रण मिळवले,तसेच रात्री उशिरापर्यंत कुलिंग फवारणीचे काम सुरू होते. मात्र अचानकपणे लागलेल्या आगीचे नेमके कारण अथवा ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र गुलदस्त्यात आहे.