वाडा : वाड्यातील दोन शिक्षिकांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनीच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दोन्ही शिक्षिका शिक्षक संचालित शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत असून नूतन बोरसे या मुंबई येथील आझाद मैदान येथे उपोषणास बसल्या आहेत, तर तृप्ती वेखंडे या वाडा येथे संस्थेच्या आवारात उपोषणास बसल्या आहेत.
वाडा येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या नूतन सीताराम बोरसे या उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करून घेण्यास व वेतन देण्यात दिरंगाई केल्याने मुख्याध्यापक, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, या मागणीसाठी, तर तृप्ती तुकाराम वेखंडे या शिक्षक संचलित शिक्षण संस्थेने विनानोटीस सेवेतून कमी केल्याच्या निषेधार्थ हे उपोषण सुरू केले आहे.
बोरसे या २०११ पासून शाळेत कार्यरत असून शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन सेवासातत्य कालावधी एक वर्ष पूर्ण झालेला असताना मुख्याध्यापक, जिल्हा परिषद पालघरचे शिक्षणाधिकारी यांनी हेतुपुरस्सर ७ मे २०१७ रोजी त्यांची नियुक्ती रद्द केल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. तसेच या प्रकरणी बोरसे यांनी संस्थेसमोर चार दिवस उपोषण करूनही न्याय न मिळाल्याने वैयक्तिक प्रस्ताव मंजुरीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही शिक्षणाधिकारी यांनी विलंबाने मंजुरी आदेश दिले, परंतु आजतागायत शालार्थ प्रणालीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. तर तृप्ती वेखंडे या वाडा येथील शिक्षक संचालित शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेत २०१० ते एप्रिल २०१९ पर्यंत सहशिक्षिका पदावर कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांना विनानोटीस देऊन सेवेतून कमी केले आहे.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद ठाणे यांच्या मंजुरीच्या अधीन राहून शिक्षण संचालित शिक्षण संस्थेच्या शालेय समन्वय समितीने त्यांना १ डिसेंबर २०११ ते ३० नोव्हेंबर २०१४ या कालावधीसाठी व त्यानंतर १ जुलै २०१३ ते ३० जून २०१६ या कालावधीसाठी पायाभूत पदावर पूर्णवेळ शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती केली होती.विनाअनुदानित पदावर विनावेतन कामतृप्ती वेखंडे या शिक्षिकेचा तीन वर्षे शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर संस्थेने त्यांच्याकडून विनाअनुदानित पदावर दोन वर्षे विनावेतन काम करून घेतले. या संदर्भात संस्थेचे सरचिटणीस भ. भा.जानेफळकर यांच्याशी संपर्क साधला असता मी बाहेरगावी असल्याचे सांगून प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली, तर शाळेचे मुख्याध्यापक बाबूराव शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता हा माझ्या अखत्यारीतला विषय नसून संस्थेच्या अखत्यारीत असल्याचे सांगितले.