तलासरी : तलासरी पोलिसांनी शनिवारी रात्री महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याचे दोन ट्रक दापचरी तपासणी नाक्यावर पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, ८० लाख २१ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर तीन आरोपी फरार झाले आहेत.
तलासरी पोलिसांनी दापचरी तपासणी नाका येथे नाकाबंदीदरम्यान गुटख्याने भरलेले दोन ट्रक पकडले. यात महाराष्ट्रात बंदी असलेला ५० लाख २१ हजार ८४० रुपयांचा गुटखा आढळून आला. हा अवैध माल दिसू नये, यासाठी ट्रकमध्ये पोहे, कुरमुरे भरले होते.तलासरी पोलिसांनी या प्रकरणी ५०,२१,८४० रुपयांचा गुटखा, तसेच प्रत्येकी १५ लाख असे ३० लाखांचे दोन ट्रक असा ८०,२१,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यावेळी मोहम्मद रिजवान खान, राकेश समसूद कोरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर गुलजार, फैजल, अशरफ हे पूर्ण नाव माहीत नसलेले तीन आरोपी फरार झाले आहेत. गुजरात, केंद्रशासित दादरा नगर हवेली राज्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आणला जातो, पण याकडे अन्न व औषधी विभागाचे दुर्लक्ष आहे.