पालघर - भापजापाचे रक्त भेसळीचे, नासके आहे, तर शिवसेनेचे रक्त भगव्याचे आहे. असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पालघर येथे श्रीनिवास वानगा यांच्या प्रचारादम्यान केला. ते म्हणाले, ''आजचा भाजप काय वाजपेयीचा भाजप आहे का? तो मोदींचा भाजप झालाय. दर दोन वर्षांनी आमचा नेता बदलत नाही, आजही शिवसेना बाळासाहेबांचीच आहे. पण एक मात्र खरे बाळासाहेब असताना तुमचे सगळे चाळे सहन करत होते. आता मी ते सहन करणार नाही. तिथेच तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. एका साध्या आदिवासी पोराने तुम्हाला घाम फोडला. तोंडाला फेस आणला. निरंजन डावखरे याना राष्ट्रवादीतून फोडला तेव्हा लगेच त्याची उमेदवारी जाहीर केली आणि दुसऱ्या दिवशी निवडणूक जाहीर केली.आणि श्रीनिवास वनगा यांना साधे विचारले देखील नाही. हे आहे भाजपाचे रक्त. नासके रक्त." उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, परवा आदित्यनाथ आले होते. योगी म्हणे, अरे हा तर भोगी. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसतो. मग हा कसला योगी. हा तर गॅसचा फुगा आहे. चपला घालून महाराजांना हार घालायला गेला. त्याच चपलांनी मारला पाहिजे. चिंदमसारखी औलाद यांच्याकडे आहे. दुसरा तो परिचारक, आपल्या सीमेवरील जवानांच्या मायभगिनींसाठी अपशब्द वापरणारा. ही भाजपची नासक्या रक्ताची उदाहरणे आहेत."आदिवासींना उध्वस्त करून एक्सप्रेस वे नेणार बुलेट ट्रेन नेणार त्याचा काय उपयोग. मुंबई गिळंकृत करण्याचा भाजप वाल्यांचा डाव आम्ही तुम्हाला यात अजिबात यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
भाजपाचे रक्त नासके, तर शिवसेनेचे भगव्याचे, उद्धव ठाकरेंचा घाणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 10:33 PM