हितेन नाईक
पालघर : वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असेल तर शिवसेना पूर्ण ताकदीनिशी तुमच्यासोबत राहील, असे पालघरमध्ये जाहीर वक्तव्य करून स्थानिकांचे मनोधैर्य वाढविणारे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्थानिकांचा बंदराला दिवसेंदिवस विरोध वाढत असतानासुद्धा अजून गप्प का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, उद्ध्वस्त होणारी गावे वाचविण्यासाठी लढा उभारणाऱ्या स्थानिकांवर पोलिसांच्या दबावतंत्राचा वापर सुरू करण्यात आला आहे.
केंद्राने वाढवण बंदराला लागणारी पर्यावरण विभागाची परवानगी मिळवीत बंदर उभारणीची जाहीररीत्या घोषणा केली असताना वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती आणि स्थानिकांनी मागील ३-४ महिन्यांपासून आपले लढे सुरू ठेवले आहेत. त्यामुळे वाढवणच्या भूमीत एक फावडे मारण्याची हिंमत अजून जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना झाली नसून वाढवण बंदरविरोधी लढ्याने आता व्यापक स्वरूप प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, सीपीएमचे आमदार विनोद निकोले, आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संस्था आदी संघटना स्थानिकांच्या लढ्यात सहभागी झाल्या आहेत.मागच्या अनेक निवडणुकांच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदर स्थानिकांना नको असेल तर शिवसेना ते कदापि होऊ देणार नाही, असा विश्वास इथल्या स्थानिकांना दिला होता. त्यामुळे पालघर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांना इथल्या मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. त्यामुळे आता याची परतफेड करायची पाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची असून ते आता राज्याचे मुख्यमंत्री असल्याने प्रथम त्यांनी वाढवण गावात घुसवलेल्या पोलिसांना माघारी बोलाविण्याचे आदेश द्यायला हवेत.
निवडणूक काळात ४-४ दिवस पालघरमध्ये तळ ठोकून राहणारे मंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक यांना शिवसेनेच्या ताकदीसोबत वाढवणवासीयांच्या मदतीला तत्काळ पाठविण्याचे आदेश द्यायला हवेत, अशी माफक अपेक्षा शिवसेनेशी एकनिष्ठ राहणारा मतदार करीत आहे.
गावात पोलीस शिरलेत, आम्हाला भीती वाटते!वाढवणवासीयांनी उभारलेल्या विरोधाला बळ मिळू नये यासाठी किनारपट्टीवरील पोलीस ठाण्यातून स्थानिक तरुण आणि पदाधिकाऱ्यांच्या ज्या चौकशा सुरू करण्यात आल्या आहेत, त्या तत्काळ थांबविण्याचे आदेशही जारी करायला हवेत, अशा मागण्या करण्यात येत आहेत. त्याचबरोबर, ‘साहेब, गावात पोलीस शिरलेत, आम्हाला भीती वाटते !’ अशी आर्त हाक शाळकरी मुले मारतानाचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.