उल्हासनगर : महापालिकेच्या नगररचनाकार विभागातील महत्त्वाच्या कपाटाला वाळवी लागल्याने दोन फाइल नष्ट, तर इतर फायलींची दैना झाली आहे. मंगळवारी फायलींची कपाटे रिकामी करून पेस्टकंट्रोल करून घेतल्याची माहिती नगररचनाकार मिलिंद सोनावणी यांनी दिली आहे.नगररचनाकार विभागात पावसाळ्यात गळती होत असल्याने कपाटाला वाळवीपासून वाचवण्यासाठी पेस्टकंट्रोल करून घ्या, अथवा इतरत्र हलवण्याची लेखी मागणी विभागाने आयुक्तांना केली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आयुक्तांसह बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने कपाटाला वाळवी लागून फाइल खराब झाल्या, असे सोनावणी यांनी सांगितले. दुसरीकडे महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, बांधकाम विभाग, महापालिका सचिव, पत्रकार कक्षासह प्रभाग समिती सभापतींच्या कार्यालयाचे नूतनीकरणावर कोट्यवधी खर्च केले आहे.आरोप-प्रत्यारोप सुरूनगररचनाकार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लाकडी कपाटातून फाइल काढल्यावर कपाट व फाइलला वाळवी लागल्याचे सोनावणी यांच्या लक्षात आले. किती फाइलला वाळवी लागून नष्ट झाल्या, असा प्रश्न विचारण्यात येत असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अखेर, विभागाने स्वखर्चाने पेस्टकंट्रोल करून घेतल्याची माहिती सोनावणी यांनी दिली. इतर विभागाच्या कपाटांची हीच अवस्था असून पालिकेच्या मुख्य फाइल रेकॉर्डरूमची तपासणी करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
उल्हासनगर पालिका : वाळवी लागल्याने फायली नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 2:26 AM